ठाणे : आतापर्यंत मुंबईतील ५३ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना विकास हवा आहे, म्हणून त्यांनी विकासाला साथ दिली आहे. तसेच यापुढेही आणखी प्रवेश होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ज्यांना विकासावर विश्वास असेल तर येत्या काळात शिवसेनेत येतील आणि त्यांची कामे केली जातील असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.
ठाण्यातील शिंदे यांच्या निवास्थानी शनिवारी दुपारी मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर नगर भागातील प्रभाग क्रमांक १२५ मधील नगरसेविका रुपाली आवळे आणि त्यांचे पती सुरेश आवळे व त्यांच्या शेकडो समर्थकांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी आपल्याकडे त्यांच्या वॉर्डातील समस्या मांडल्या आहेत, त्या समस्या सुटत नसल्यानेच त्यांनी आता विकासाला साथ दिली असल्याचेही यावेळी शिंदे यांनी सांगितले.
राज्य सरकाराच्या माध्यमातून मागील काही दिवसापासून मुंबईत डिप क्लिन ड्राईव्हच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील प्रदुषण कमी होण्यास मदत झाली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामे केली जात आहेत. त्यामुळेच आतापर्यंत ५३ हून अधिक नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यापुढेही पक्ष प्रवेश सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी घरात बसणार मुख्यमंत्री नाही तर रस्त्यावर उतरुन काम करणारा मुख्यमंत्री असल्यानेच अनेकांना आपल्यावर विश्वास दाखविला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.