ठाणे : सावरकरनगर भागात राहणारे सुधाकर रत्नाकर हे महापालिकेच्या वाडिया लसीकरण केंद्रावर लसीबाबत चौकशी करण्यासाठी गेले असता काही डॉक्टरांनी लागलीच लस घ्या, नाही तर ५०० रुपये दंड भरावा लागेल, अशी दमदाटी केली. रत्नाकर यांनी आपण लस घेण्याकरिता आलेलो नसून केवळ चौकशी करण्याकरिता आल्याचे सांगितले व ते निघून आले. लस न घेताच घरी परतलेल्या रत्नाकर यांच्या मोबाइलवर पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आल्याने ते अवाक् झाले आहेत. यांदर्भात पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे त्यांनी लेखी तक्रार केली.
सुधाकर रत्नाकर हे १४ जून रोजी पालिकेच्या वाडिया लसीकरण केंद्रावर कोणती लस देण्यात येत आहे, याची चौकशी करण्यासाठी गेले होते. लसीकरण केंद्रावरील डॉक्टरांनी त्यांना त्यांचे आधार कार्ड आणि पॅनकार्ड दाखविण्यास सांगितले. मात्र, आपले आधारकार्ड व पॅनकार्ड फोनमध्ये असल्याचे सांगून त्यांनी आपला फोन डॉक्टरांकडे दिला. त्यानंतर या डॉक्टरांनी आपल्याला ‘लस घ्या, अन्यथा ५०० रुपये दंड भरावा लागेल’ असे सांगितले. आपण केवळ कोणती लस उपलब्ध आहे याची चौकशी करण्यासाठी आलो असून, आपल्याला लस घ्यायची नसल्याचे सांगून ते लसीकरण केंद्रामधून निघून थेट घरी आले. मात्र, संध्याकाळीच त्यांच्या मोबाइलवर लसीकरणाचा पहिला डोस झाल्याचे प्रमाणपत्र आल्याने ते अवाक् झाले.
रत्नाकर यांनी पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात लेखी तक्रार केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. लस न घेताच पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र फोनवर आल्याने आता आपले लसीकरण कसे होणार, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
...........
लसीकरण केंद्रावर लस न घेताच मोबाइलवर प्रमाणपत्र येणे शक्य नाही. लस घेतली नाही म्हणून ५०० रुपये दंड मागितला आहे की नाही हे चौकशीनंतरच उघड होईल. पालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर व्यवस्थित लसीकरण सुरू आहे.
-संदीप माळवी, उपायुक्त, ठा.म.पा
...........