कल्याण : केंद्रशासनाच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमात दाखल झालेल्या ६० नव्या बसेस चालक आणि वाहकांच्या कमतरतेमुळे गेले चार महिने धूळखात पडल्या आहेत. गुरूवारच्या परिवहनच्या बैठकीत सर्वपक्षिय सदस्यांनी उपक्रमाचे व्यवस्थापक देवीदास टेकाळे यांना याबाबत चांगलेच फैलावर घेतले. तत्काळ रिक्तपदे भरून त्या चालविण्यात याव्यात असे निर्देश सभापती नितिन पाटील यांनी दिले.जेएनएनयूआरएमतंर्गत परिवहन उपक्रमात १८५ बसेस दाखल होणार आहेत. यातील १० व्होल्व्हो दाखल झाल्या असून अन्य बसेसपैकी ६० बसेस उपक्रमाच्या ताफ्यात आल्या आहेत. पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी त्या मेट्रो मॉल आणि वसंत व्हॅली येथे धूळ खात पडल्या आहेत. आॅगस्ट २०१५ मध्ये या बसेसचे लोकार्पण झाले. परंतु, आजतागायत त्या नागरीकांच्या सेवेत दाखल नाहीत. एखाद्या जुन्या बसेसमध्ये बिघाड झाल्यास पर्यायी म्हणून या नव्या बसेसचा तात्पुरता आधार घेतला जातो. मनसेचे परिवहन समितीचे सदस्य दीपक भोसले यांनी सप्टेंबर महिन्यात याकडे लक्ष वेधून आंदोलनचा इशारा दिला होता. > जुन्या गाड्यांमध्ये तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा केडीएमटीला ‘दे धक्का’! केडीएमसीच्या रस्त्यावर धावणाऱ्या बसेस तांत्रिक दृष्ट्या निकामी असून ठिकठिकाणी बंद पडत असल्याने प्रतीदिन शेकडो प्रवाशांना त्याचा त्रास होत आहे. अशीच घटना शुक्रवारी दुपारी३ वा. भगतसिंग रोडवर घडल्याने टिळक पथासह महापालिकेपर्यंत काही काळ वाहतूककोंडी झाली. अखेरीस नागरिकांनीच एकत्र येऊन ४६२ क्रमांकांच्या बसला ‘दे धक्का’ मारून ती रस्त्याच्या कडेला कशीबशी उभी केली.दुपारी ही घटना घडली तरीही वाहतूकीचे तीनतेरा झाले. जर सकाळी-संध्याकाळी गर्दीच्या वेळेत घडली असती तर मात्र प्रचंड पंचाईत झाली असती. आधीच मानपाडा रस्त्यावर काम सुरु असल्याने तेथे एकेरी मार्ग आहे. त्यामुळे वाहतुकीचा बहुतांशी ताण हा या मार्गावर आहे. त्यात अशा घटना घडल्यास वाहतूककोंडी सोडवतांना ट्रॅफिक विभागाच्या नाकीनऊ येतात. तुटलेला जॉइंट निखळून रस्त्यावर पडल्याचे वाहक-चालकांच्या लक्षात आल्यावर मात्र, त्यांच्या तोंडचे पाणीच पळाले. अनेक नागरिकांना आवाहन केल्यानंतर काही सतर्क नागरिकांनी धक्का मारून गाडी बाजूला घेतल्याने त्या कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. मात्र तोपर्यंत भगतसिंग रोड वाहनांनी पूर्ण पॅक झाला होता, काहींनी पीपी चेंबर्सकडून गाड्या माघारी घेण्याचा द्रविडी प्राणायाम केल्याने कोंडीत अधीकच भर पडली.परिवहनच्या बसेसला समस्या आहेत, नव्या बसेस धुळखात आहेत हे देखिल मान्य आहे. परंतु, त्यासाठी चालक भरतीची प्रतिक्षा असून ती पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. दिवसागणिक तांत्रिक बिघाडात वाढ होत असल्याचे आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. - नितीन पाटील, सभापती, केडीएमटी
‘त्या’ नव्या बसेस वापराविना धूळखात
By admin | Published: December 12, 2015 1:36 AM