- राजू ओढे ठाणे : एकेकाळी गंभीर गुन्ह्यांनी बरबटलेले ठाणे कारागृहातील कैद्यांचे हात आता कुंचल्यांवर फिरू लागले आहेत. चिंतन उपाध्याय यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकाराच्या सहवासात या कैद्यांनी एकापेक्षा एक सरस कलाकृती चितारल्या आहेत.पत्नी आणि तिच्या वकिलाचा खून केल्याच्या आरोपाखाली प्रख्यात चित्रकार चिंतन उपाध्याय यांना दोन वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. ते सध्या ठाणे कारागृहात आहेत. कारागृहातील त्यांच्या सहवासातून इतर कैद्यांमध्ये दडलेल्या कलाकारास चालना मिळावी, कारागृहाच्या रूक्ष दिनचर्येतून कैद्यांना दोन क्षण आनंदाचे घालवता यावे, यादृष्टीने जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे तुरुंग अधीक्षक नितीन वायचळ यांनी अभिनव उपक्रम सुरू केला. त्यानुसार, चित्रकला शिकू इच्छिणाºया कैद्यांना आॅगस्ट महिन्यात चिंतन उपाध्याय यांच्या मदतीने प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले. कारागृहातील ९ कैद्यांनी या कलेमध्ये रुची दाखवली. त्यांना पेन्सील किंवा स्केच पेनने चित्रे रंगवण्याची आवड होती. ब्रशने चित्र रंगवण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती. उपाध्याय यांनी कैद्यांना काल्पनिक चित्रे रंगवण्यास सांगितले.कारागृहाचे रूक्ष जीवन आणि आप्तेष्टांचा विरह सहन करणाºया या कैद्यांनी अतिशय आकर्षक कलाकृती चितारल्या. बहुतेक कैद्यांच्या कलाकृतींमध्ये त्यांच्या रूक्ष जीवनाचे प्रतिबिंब उमटले. कैद्यांनी केलेल्या १० ते १२ कलाकृती कारागृहामध्ये तयार आहेत. या कलाकृतींची प्रदर्शनी कारागृह परिसरात लवकरच आयोजित केली जाणार असल्याची माहिती नितीन वायचळ यांनी दिली. राज्यातील इतर कारागृहांमध्येही अशाच प्रकारचे काही उपक्रम राबवण्यात आले होते. या सर्व कलाकृतींची एकत्रित प्रदर्शनी कमलनयन बजाज आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असे वायचळ यांनी सांगितले.कारागृहात कैद्यांची दिनचर्या ठरलेली असते. पश्चात्तापाची भावना त्यांच्या मनात घर करून असते. समाजाचा रोष आणि आप्तेष्टांचा विरह सहन करून त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. या परिस्थितीतून काही क्षण का होईना कैद्यांना बाहेर पडता यावे, या एकमेव उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला होता. सुदैवाने चिंतन उपाध्याय यांच्यासारख्या ख्यातनाम कलाकाराची साथ लाभली आणि हा उपक्रम यशस्वी होऊ शकला.- नितीन वायचळ,- तुरुंग अधीक्षक,जिल्हा मध्यवर्ती कारागृह, ठाणे
ठाणे कारागृहात कैद्यांचे कला‘चिंतन’! एकाहून एक सरस चित्र, चिंतन उपाध्याय या आंतरराष्ट्रीय कलाकाराचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 6:05 AM