- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेने कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्पुरत्या व कंत्राटी तत्वावर डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉयसह एकून २७४ पदासाठी थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया सुरू केली. बुधवारी ७६ नर्स पदासाठी हजारो इच्छुकांनी गर्दी केल्याने, भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची नामुष्की पालिकेवर आली आहे.
उल्हासनगर महापालिकेने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ऐन कोरोना काळात तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आदी पदांची भरती केली. कोरोना महामारीत स्वतःसह कुटुंबावर तुलसीपत्र ठेवून त्यांनी आरोग्य सेवा दिली. मात्र भविष्यात नोकरीसाठी महापालिकेकडे हक्क सांगतील, या भीतीतून महापालिकेने पुन्हा तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय अश्या विविध २७४ पदासाठी थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया ६ ऑक्टोबर पासून राबविली. भरती प्रक्रियेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. बुधवारी नर्सच्या ७६ जागेसाठी हजारो इच्छुकांनी सकाळी ५ वाजल्या पासून महापालिका प्रवेशद्वार समोर एकच गर्दी केली. इच्छुक उमेदवारांच्या गर्दीने अनेक महिला घाबरून खाली पडल्यावर, महापालिका प्रशासनाला जाग आली.
महापालिकेच्या नर्स पदासाठी हजारो जणांनी गर्दी केल्याने, राज्यात बेकारी किती वाढली. याचा प्रत्यय नागरिकांना आला. गर्दीला हाताळण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरल्यावर पोलीस व सुरक्षा रक्षकांची मदत घेण्यात आली. उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांना परिस्थितीची माहिती दिल्यावर, अखेर नर्स, वॉर्डबॉयसह इतर पदाची भरती प्रक्रिया रद्द करून पुढे ढकलली. महापालिका संकेतस्थळावर भरतीचे सुधारित वेळापत्रक प्रसिध्द करण्यात येईल. अशी माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. भरती प्रक्रिया रद्द केल्याने हजारो इच्छुकांनी महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करून घोषणाबाजी केली.
महापालिका शिफारसपत्राचा ढीग
महापालिका कोविड संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह विविध पदासाठी थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया राबविली. मात्र बहुतांश इच्छुक उमेदवारांकडे मंत्री, खासदार, आमदार, महापालिकेतील पदाधिकारी यांचे शिफारसपत्र अर्जा सोबत जोडल्याचे एकून चित्र यावेळी होते. भरती प्रक्रिया पारदर्शक घेण्याची मागणी सर्वस्तरातून होत असून कोविड काळात रुग्ण सेवा देणाऱ्यांना जुन्याच कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत घेण्याची मागणीही होत आहे.