लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणो : यंदाच्या उन्हाळी सुटीतही पोषण आहार विद्यार्थ्यांना न देता त्या बदल्यात या आहाराची किंमत सुमारे दीडशे रुपये विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, असा निर्णय शासनाने घेतला आहे. पण या अल्प रकमेसाठी हजारांचे बँक खाते उघडण्यासाठी पालक वर्गात तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या नापसंतीमुळे शासनाला कदाचित या निर्णयाऐवजी पालकांच्या सोयीचा निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद आदींच्या शाळांसह खासगी अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीचे पाच लाख सहा हजार ४०७ विद्यार्थी या शालेय पोषण आहाराचे लाभार्थी आहेत; मात्र कोरोनाच्या या कालावधीत शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना या पोषण आहाराचा लाभ मिळाला नाही. या शिवाय उन्हाळ्याच्या सुटीतील पोषण आहारही मिळालेला नाही. त्यामुळे सुटीच्या कालावधीतील पोषण आहाराच्या मोबदल्यात विद्यार्थ्यांना या आहारास लागणारी किंमत विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या पोषण आहाराच्या बदल्यात रक्कम रुपये दीडशे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ४०७ विद्यार्थ्यांच्या पालकांना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याचे फर्मान काढण्याची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे. जिल्ह्यातील शालेय पातळीवर हा विषय सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेला आला आहे.विद्यार्थ्यांस सुमारे दीडशे रुपये मिळणार असून त्यासाठी हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा करून बँक खाते उघडण्यासाठी पालकांची मानसिकता नसल्याचे दिसून येत आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्यास उत्तम असलेला हा पोषण आहार रोज वाटप केला जात आहे. या आहाराद्वारे प्राथमिक शाळेच्या एका विद्यार्थ्यांस १०० ग्रॅम तांदूळ, २० ग्रॅम कडधान्य आदींचा या पोषण आहारामध्ये समावेश आहे. याप्रमाणेच अपर प्रायमरीच्या विद्यार्थ्यांना १५० ग्रॅम तांदूळ व ३० ग्रॅम कडधान्य आहारामध्ये दिले जात आहे. याप्रकारचा महिनाभर लागणाऱ्या पोषण आहाराऐवजी त्यास लागणारी सुमारे दीडशेपर्यंतची रक्कम लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे फर्मान शासनाने सोडले आहे. यासाठी पालकांना बँकेत जावे लागणार आहे. बँकेच्या मर्जीप्रमाणे ५०० ते हजार रुपये खात्यात जमा करून त्याचे खाते उघडावे लागणार असल्यामुळे पालकांमध्ये या बँक खात्याच्या निर्णयाविरोधात नापसंती आहे.
----------