लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : महावितरणच्या मुख्य वीजवाहिनीत बुधवारी दुपारी तांत्रिक बिघाड झाल्याने ठाकुर्ली परिसरातील ७०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. तसेच पाथर्ली परिसरातही तांत्रिक कारणांमुळे सकाळच्या वेळेत काही काळ वीजप्रवाह बंद होता.
सावरकर रोड परिसरात मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने तेथील वीज गायब झाली. तसेच या परिसरात दिवसभर विजेचे व्होल्टेज कमीजास्त होत होते. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले होते. दरम्यान, दोन दिवसांत हजारो ग्राहकांना विजेच्या लपंडावाला सामोरे जावे लागले.
या संदर्भात महावितरणच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, ठाकुर्ली भागात मारुती मंदिर, गावदेवी परिसरात मुख्य वीजवाहिनीत बिघाड निर्माण झाला होता. त्यामुळे तीन ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे समस्येत वाढ झाली होती. मात्र, साधारण तास-दीड तासात हा बिघाड दुरुस्त करण्यात आला. तसेच सावरकर रोडवर रात्री ११ ते ११.३० दरम्यान वीजपुरवठा खंडित झाला होता.
---------------