ठाणे : कळवा येथील घोलाईनगरात झालेल्या दुर्घटनेनंतर डोंगरावरील किंवा पायथ्याला असलेल्या हजारो कुटुंबांना या घटनेने आता धोक्याची घंटा दिली आहे. आजही महापालिकेने जाहीर केलेल्या १४ ठिकाणांवरील हजारो कुटुंबापुढे टांगती तलवार आली आहे. येथील रहिवाशांना पावसाळ्यापूर्वी महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. त्यापलीकडे कारवाई अद्यापही झालेली नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. त्यातही अशा बांधकामांना परवानगी कशी दिली जाते, वीज, पाणी आदींची व्यवस्था कोण करते? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
घोलाईनगर भागात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर डोंगराजवळ आणि नाल्याजवळील उभारलेल्या घरांमधील हजारो कुटुंबांचा आता जीव टांगणीला लागला आहे. मान्सूनच्या काळात उद्भवणाऱ्या विविध आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज असते. त्यानुसार भूस्खलन आणि सखल भागांची यादी तयार करण्यात येत असते. त्यानुसार ठाणे महापालिकेने शहरातील १४ ठिकाणी हा धोका असल्याचे सांगून त्यांची यादीदेखील प्रसिद्ध केली आहे. दरवर्षी अशी यादी तयार करून रहिवाशांना नोटिसा बजावून घरे खाली करण्याचेही सांगितले जाते. परंतु पुढील कारवाई काही होताना दिसत नाही. त्यात मागील वर्षापासून कोरोनाच्या सावटाखाली ठाणेकर जगत असल्याने आता त्यात पावसाळ्यात पुन्हा अशाप्रकारे नोटीस बजावण्याची कारवाई सुरू झाल्याने येथील नागरिक हवालदील झाले होते. सोमवारी घोलाईनगरला घडलेल्या दुर्घटनेनंतर हा भागही याच यादीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता तरी महापालिका प्रशासन जागे होऊन येथील रहिवाशांना येथून हलविणार का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. याशिवाय मतांच्या राजकारणासाठीदेखील येथील रहिवाशांना हलविण्यासाठी राजकीय मंडळी पुढे येत नसल्याचेही वास्तव समोर आले आहे..
ही आहेत १४ ठिकाणे
मुंब्रा, लोकमान्यनगर, कळवा, माजिवडा मानपाडा या भागांतील काही ठिकाणांचा त्यात समावेश आहे. त्यानुसार लोकमान्यनगर भागातील गुरुदेव आश्रम जवळ, उपवन, माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत डोंगरीपाडा, पातलीपाडा आणि कळशीपाडा यांचा समावेश आहे. कळव्यात - आतकोनेश्वरनगर, पौंड पाडा, शिवशक्तीनगर, घोलाईनगर, वाघोबानगर, भास्करनगर आदींचा समावेश आहे. तसेच मुंब्य्रातील आझादनगर, गावदेवी मंदिरलगत, केणीनगर, सैनिकनगर आणि कैलासनगरचा समावेश आहे.