लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : ई-चलानद्वारे आपल्या वाहनावर दंड तर साचत नाही ना? वाहनाची नोंदणी करताना अनेक वाहनचालकांचा मोबाइल नंबर वेगळा आणि सध्या वापरात असलेला वेगळा, असे झाल्याने त्यांना ई-चलान मिळत नाही. त्यामुळे हा दंड साचत आहे.
शहरातील लाखो वाहनचालकांनी याबाबतची माहिती तातडीने घ्यायला हवी. तसेच आरटीओ दरबारी सध्या जो मोबाइल क्रमांक वापरात असेल तो देऊन स्वतःची माहिती अपडेट करावी, अन्यथा दंडाची रक्कम वाढत जाऊन जेव्हा तो खर्च वारेमाप होईल तो भुर्दंड मात्र वाहनचालकांच्या चुकीमुळे किंबहुना दुर्लक्षामुळे भरावा लागेल, असे सांगून संबंधित यंत्रणेने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
-----------------
ई-चलान मशीनद्वारे केलेल्या केसेस-
२०२०- ४२ हजार ३९
२० ऑगस्ट २०२१ पर्यंत - ३९ हजार ६६५
-------------
दंड वसूल केलेल्या केसेस-
२०२०- १३ हजार ५६१
२० ऑगस्ट २०२१- ८ हजार ४९७
---------------------
वरिष्ठ वाहतूक पोलिसांनी दिलेली माहिती :
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचा ई-चलान मशीन/डिव्हाइसमध्ये नियमांचे उल्लंघन करताना फोटो घेण्यात येतो. तो डिजिटल एव्हिडन्स म्हणून त्या डिव्हाइसमध्ये अपलोड करून संबंधित वाहनांचा नोंदणी क्रमांक नमूद करून दंड आकारला जातो. सदरचा दंड आकारल्याबाबत वाहनचालक/मालक यांचे नोंदणी करतेवेळी नमूद केलेल्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठवून अवगत करण्यात येते व सोबतच्या लिंकद्वारे संबंधितास केलेल्या कारवाईची फोटोसह सविस्तर माहिती पाहता येते. यामध्ये ई-चलान क्रमांक, फोटो, दंड आकारल्याचा दिनांक, वेळ व ठिकाण, कोणत्या नियमांचे उल्लंघन केले याची माहिती नमूद असते.
-----------------
वाहनधारकाचा मोबाइल नंबर अपडेट नसेल/ वेगळा असेल तर त्यांना संदेश मिळणार नाही.
मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी आपल्या जवळपासच्या वाहतूक पोलीस शाखा, प्रादेशिक परिवहन विभाग यांच्याकडे जाऊन अपडेट किंवा बदलता येतो.
--------------------
डोंबिवली वाहतूक उपविभागाच्या हद्दीतील ई-चलानद्वारे आकारलेल्या दंडाची थकबाकी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहतूक विभागाकडून वेळोवेळी असे प्रलंबित दंड वसूल करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाते.
------------------
कोट:
ई-चलान ही प्रक्रिया वाहतूक नियमांचे पालन होण्यासाठी व सर्वसामान्य जनतेच्या सुविधेसाठी अमलात आणली आहे. एक जागरूक नागरिक म्हणून सर्वांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच आपल्या वाहनांवर आकारलेला दंड प्रत्येकाने वेळीच जवळपासच्या वाहतूक पोलीस अथवा वाहतूक शाखेमध्ये भरणा करावा.
- उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, डोंबिवली