- सदानंद नाईक उल्हासनगर : शहरात पाणी टंचाई निर्माण झाली असताना दुसरीकडे खेमानी परिसरात जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. महापालिका पाणी पुरवठा विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.
उल्हासनगरात पाणी वितरण अनियमित होत असल्याने, अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली. गेल्या आठवड्यात चोपडा कोर्ट, आंबेडकरनगर मधील पाणी टंचाईच्या निषेधार्थ महिला रस्त्यावर उतरून त्यांनी रस्ता रोखो आंदोलन केले. महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रहेजा यांनी दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करतो. असे आश्वासन महिलांना देऊन घरी पाठविले होते. मात्र दोन दिवसानंतरही पाणी पुरवठा नियमित झाला नसल्याच्या निषेधार्थ महिलांनी महापालिकेवर धडक देऊन पाणी टंचाई बाबत जाब विचारला. शहर पूर्वेत अनेक भागात दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. असे असताना दुसरीकडे खेमानी परिसरात जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी खाली जात आहे. स्थानिक नागरिकांनी प्रभाग अधिकारी, प्रभाग सभापती यांच्यासह पाणी पुरवठा विभागाला माहिती देऊनही जलवाहिनीची दुरुस्ती करण्यास कर्मचारी येत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
महापालिका पाणी पुरवठा विभाग ढिम्म असल्याने, शहरात ३० टक्के पेक्षा जास्त पाणी गळती होत असल्याचे बोलले जाते. शहरवासीयांना मुबलक व नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी काही वर्षांपूर्वी ३५० कोटींची पाणी वितरण योजना राबवून शहरभर नवीन जलवाहिन्या टाकून जलकुंभ व बूस्टर पंप मशीन बसविण्यात आले. मात्र योजना योग्य रीतीने राबविली नसल्याने, पाणी वितरण योजना फसल्याची टीका होत आहे. खेमानी येथील जलवाहिनी फुटल्या बाबत विभागाचे कार्यकारी अभियंता रहेजा यांना संपर्क साधला असता झाला नाही.