उल्हासनगर : शहरात पाणीटंचाई असताना खेमानी ते टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्याखालील जलवाहिनीला गळती लागून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे स्थानिकांनी तक्रार करूनही दुरुस्ती करण्यात आली नाही.
उल्हासनगरातील चोपडा कोर्ट, आंबेडकरनगर, दुर्गानगर, सुभाष टेकडी, संभाजी चौक आदी परिसरात पाणीटंचाईची स्थिती असताना, दुसरीकडे जलवाहिन्यांना गळती लागून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाला कळवूनही दुरुस्ती होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. कॅम्प नं. २ खेमानी परिसरातील टेकडी भागात जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी खोदकाम करण्यात येत आहे. या वेळी मुख्य जलवाहिन्यांसह अन्य जलवाहिन्यांना गळती लागून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. रस्त्याच्या मधोमध पाच फुटांचा खड्डा पडल्याने, मोठा अपघात होण्याची भीती मनसेचे पदाधिकारी प्रवीण माळवे यांनी व्यक्त केली आहे.
महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर रहेजा यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही. मात्र अद्यापही जलवाहिनीची गळती बंद केली नसल्याने पाणी गटारात जात असल्याचे चित्र आहे. शहरात जलवाहिनीला गळती लागण्याच्या प्रमाणात वाढ होऊनही गळती बंद केली जात नसल्याचा आरोप होत आहे. रस्त्याचे बांधकाम व जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली.