डोंबिवली : रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमधून वाहन चालवणे तर सोडा, चालणेही मुश्कील झाले आहे. खड्डे पाण्याने भरलेले असल्याने त्यांच्या खोलीचाही अंदाज वाहनचालकांना येत नाही. त्यामुळे या खड्ड्यांमध्ये आदळून वाहने बंद पडून त्याचा भुर्दंडही बसत आहे. भगतसिंग रस्त्यावर महापालिकेच्या कॉर्नर ते टिळकपथापर्यंतच्या अंतरावर वाहनचालकांनी खड्ड्यांची मोजणी केली असता सव्वाशे खड्डे असल्याचे उघड झाले. सर्वच रस्त्यांवर हजारो खड्डे असून केडीएमसीच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण शहरच खड्ड्यांत गेल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे.भगतसिंग रस्ता हा ‘फ’ प्रभाग समितीचे सभापती विश्वदीप पवार यांच्या शिवमार्केट प्रभागात येतो. खड्ड्यांची समस्या ही दरवर्षीची डोकेदुखी ठरली आहे. सतत होणाऱ्या डांबरीकरणामुळे मूळ रस्त्याची उंचीही वाढली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. त्याचा वाहनचालकांना त्रास होतो. या रस्त्यावरून पालिकेचा निवासी विभाग तसेच कल्याण, दावडी आदी भागांत जाणाºया परिवहन विभागाच्या बस, स्कूलबस, बहुतांशी रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहने, अन्य अवजड वाहनांची रात्रंदिवस वर्दळ सुरू असते. आठवडाभरापासून पडणाºया पावसामुळे या रस्त्याची चाळण झाली आहे. वाहनांचा वेग मंदावला आहे. ठिकठिकाणी सहा इंच खड्डे पडल्यामुळे महापालिकेच्या रस्ते विभागाचे काम करणाºया अभियंत्यांची पोलखोल झाली आहे.शहरातील टिळक पुतळा ते मशाल चौक हा रस्ता सोडला, तर एकही रस्ता धड नाही. ठिकठिकाणी डांबरी रस्त्यांवर वाहनचालकांना समस्या भेडसावत आहे. त्यामुळे वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे. वाहनांच्या दुरुस्ती खर्चात वाढ झाल्याने भुर्दंड बसत आहे.वाहने पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले : रोलर आणून खडी टाकून तात्पुरता खड्डा बुजवून काहीही होत नाही. त्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने दर्जेदार काम करणे आवश्यक आहे. अन्यथा, ही सगळी थुंकपट्टी असून आठवडाभरात त्या रस्त्यावर भयंकर खड्डे पडले आहेत. खडी टाकून खड्डे बुजवणे ही नागरिकांच्या डोळ्यांत धूळफेक असल्याचा संताप वाहनचालकांनी व्यक्त केला. त्या खडीमुळे दुचाकी पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे.भगतसिंग रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यासंदर्भात महापालिकेच्या अभियंत्यांना बुधवारी पत्र दिले आहे. आगामी काळातील दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र यापाठोपाठ येणाºया सणांमध्ये कोणताही अपघात होऊ नये, तसेच दैनंदिन वाहन चालवताना वाहनचालकांना त्रास होऊ नये, अशा स्वरूपात दर्जात्मक काम करून रस्ता सुधारण्यासाठी पत्रात नमूद केले आहे.- विश्वदीप पवार, सभापती, ‘फ’ प्रभाग समिती
डोंबिवली शहरात पडले हजारो खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 11:54 PM