ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत २०१८-१९ या वर्षातील अंदाजपत्रकामध्ये केलेल्या १६,५९,१२,७१४ तरतूदीपैकी रक्कम १२ कोटी ८४ लाख २६ हजार १२७ इतकी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे. डीबीटी (डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर) योजनेतंर्गत विद्यार्थीनिहाय विहित केलेले अनुदान त्यांच्या बँक खात्यावरच जमा केले असून याबाबत शिक्षण विभागाकडे विद्यार्थी, पालक किंवा इतरांमार्फत कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झालेली नाही. त्याचप्रमाण ठाणे महानगरपालिकेच्या कोणत्याही विद्यार्थ्यांचे वार्षिक निकाल किंवा शाळा सोडल्याचे दाखले हे थांबविण्यात आले नसल्याचा दावा उपायुक्त (शिक्षण) मनीष जोशी यांनी केला आहे.मतदाता जागरण अभियानाचे संजीव साने यांनी ठामपा शिक्षण विभागाच्या डीबीटी योजनेतील गोंधळाचा वर्ग आणि विद्यार्थी संख्येनिहाय लेखाजोखा मांडल्यानंतर महापालिकेने हा दावा केला आहे.ठाणे महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती समाधानकारक नसल्याने तसेच एकापेक्षा अधिक मुले महापालिकेच्या शाळेत शिकत असल्याने शैक्षणिक साहित्य आगाऊ खरेदी करणे शक्य नसून त्याचा पुरावठा शालेय व्यवस्थापन समितीच्या नियंत्रणाखाली करण्यात यावा, असा ठराव संमत झाला आहे. त्यानुसार प्रत्येक शाळा व्यवस्थापन समितीच्या नियंत्रणाखाली शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यात आले. तसेच ते गुणवर्णनप्रमाणे नव्हते, ते व्यवस्थापन समितीतर्फे बदलून घेण्यात आले. ते स्पेसिफिकेशननुसार व सुस्थितीत असल्याबाबत प्रमाणपत्र मुख्याध्यापकांनी सादर केल्यानंतरच विद्यार्थ्यांया बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केल्याचे मनीष जोशी यांनी सांगितले.शैक्षणिक वर्ष २०१८-१९ करिता विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून वस्तूनिहाय बाजारभाव तसेच गुणवर्णन निश्चित करण्यात आले असून याबाबत मुख्याध्यापकांना परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.कोणत्याही विद्यार्थ्यांवर ठराविक ठेकेदाराकडून वस्तू खरेदी करणेबाबत सक्ती करू नये असे परिपत्रक काढण्यात आले. आहे, असे जोशी यांनी स्पष्ट केले आहे.
हजारो विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’चा लाभ, महापालिकेचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 1:10 AM