ठाणे- राम गणेश गडकरी रंगायतन समोर नागरिक बिल्डरची कन्ट्रक्शन साइट सुरू असून या साईटवरील पाणी थेट पंपिंग स्टेशनच्या जनरेटरपर्यंत घुसू लागले होते. हीच परिस्थिती कायम राहिल्यास पंपिंग स्टेशनवर परिणाम होऊन हजारो ठाणेकरांचे जीव धोक्यात येऊ शकतात. राम गणेश गडकरी रंगायतन शेजारी असणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कंपाऊंडमध्ये ठाणे महापालिकेचे पंपिंग स्टेशन आहे. शहरातील पाणी या पंपिंग स्टेशनद्वारे थेट खाडीत सोडले जाते. याच पंपिंग स्टेशन समोर नागरिक बिल्डरचे बांधकाम सुरु आहे. बांधकामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला असून त्यामध्ये साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याचे कोणतेही नियोजन बिल्डरकडून करण्यात आलेले नाही. उलट हे पाणी थेट मुख्य रस्त्यावर सोडण्यात आले आहे. आज पावसाचा जोर वाढताच या साईटवरील पाणी वेगाने मुख्य रस्त्यावर आले व समोर असलेल्या एमजीपीच्या कार्यालयात, समोरच्या घरांमधे शिरले तसेच हे अचानक वाढलेले पाणी पंपिंग स्टेशनच्या जनरेटरपर्यंत पोहचले.जर हा जनरेटर बंद पडला तर संपुर्ण ठाण्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच डाँ मुस रोड जलमय होऊन पाणी रंगायतनच्या कंम्पाऊंडमधे घुसू लागले होते. दरवर्षी या भागात पाणी साचत नव्हते यावर्षी बिल्डरच्या गलथानपणामुळे या परिसरातील नागरिकांसह ठाणेकरांचे जिव धोक्यात आले आहेत.
नागरिक बिल्डरच्या गलथानपणामुळे हजारो ठाणेकरांचे जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 11:39 AM