कल्याण : उल्हास नदीत विहार करणाऱ्या कासवाच्या गळ्यात निर्माल्याचा धागा अडकल्याची घटना घडली आहे. नदीकिनारी आलेल्या या कासवाच्या गळ्यातील धागा उल्हास नदी बचाव कृती समितीचे कार्यकर्ते व पोलिसांनी काढून त्याला पुन्हा नदीच्या पात्रात सोडून दिले आहे.
उल्हास नदी ही उगमानंतर कर्जतपासून प्रदूषित आहे. लॉकडाऊनच्या काळात कारखाने बंद असताना नदीतील प्रदूषण कमी झाले होते. त्यामुळे नदीचा प्रवाह नितळ झाला होता. त्यामुळे नदीतील जैवविविधता पुन्हा पुनर्जीवित होत असल्याचे चित्र होते. त्यामुळे पुन्हा नदी प्रदूषित होऊ नये, यासाठी रायते पूल, पाचवा मैल येथे गणेशमूर्तींचे विजर्सन करू नये, असे आवाहन नदी बचाव कृती समितीचे प्रमुख रवींद्र लिंगायत यांनी गणेशोत्सवापूर्वी केले होते. तरीही, अनेक ठिकाणी नदीकिनारी वाहत्या पाण्यात गणेश विसर्जन केले जात आहे. तसेच यावेळी निर्माल्यही नदीच्या पाण्यात सोडले जात आहे. याच निर्माल्यातील हाराचा धागा पाण्यातील कासवाच्या गळ्याभोवती आवळला गेला. त्यामुळे त्याने नदीकिनारी धाव घेतली. त्याचा श्वास गुदमरला होता. ही बाब नदीकिनारी उपस्थित असलेले नदी बचाव कृती समितीचे सदस्य निकेश पावशे व पोलीस निरीक्षक बजरंग राजपूत यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी कासवाच्या गळ्यातील धागा काढून त्याला पुन्हा नदीच्या पात्रात सोडले.