- जितेंद्र कालेकरठाणे : ठाणे : कोरोना या विषाणूची लागण होऊ नये, यासाठी बहुतांश ठाणेकरांमध्ये जागृती आली आहे. या विषाणूच्या प्रसारातून त्याची लागण होण्याच्या भीतीने गेल्या दोन दिवसांपासून ठाण्यातील बाजारपेठांसह वर्दळीच्या ठिकाणीही नागरिकांची गर्दी रोडावली आहे. त्यामुळे शहरातील रिक्षाचालकांच्या व्यवसायावरही परिणाम झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.शहरातील लोकमान्यनगर ते ठाणे रेल्वेस्थानक, माजिवडा, कापूरबावडी, कोलशेत ते ठाणे स्थानक, गावदेवी ते घोडबंदर रोड या मार्गावर प्रवासासाठी रिक्षाला प्रवाशांकडून मोठी मागणी असते. जांभळीनाका येथून शहरातील विविध भागांत जाण्यासाठीही अशीच गर्दी असते.सोमवार कामाचा पहिला दिवस असतानाही नेहमीप्रमाणे रस्त्यावर वर्दळ नव्हती. त्यामुळे शास्त्रीनगर, लोकमान्यनगर, शिवाईनगर, कळवा तसेच घोडबंदर येथील रिक्षाचालकांना दुपारपर्यंत ५०० रुपयांचाही आकडा गाठता आला नव्हता. कोरोनाच्या धास्तीने नागरिक बाहेर पडत नाही. शाळा, महाविद्यालय बंद आहेत. बाजारपेठांमध्येही गर्दी नसते. त्यामुळे एरव्ही रिक्षा शोधणारे ग्राहक असे चित्र असायचे. आता याउलट, प्रवाशांची वाट पाहणारे रिक्षाचालक अशी परिस्थिती झाल्याचे एका रिक्षाचालकानेच सांगितले.एरव्ही, रिक्षाचे भाडे, गॅस आणि इतर खर्च वगळून किमान एक हजाराची रक्कम हातात पडते. परंतु, आता प्रवाशांच्या संख्येअभावी गॅसचे पैसेही दिवसभरात हातात पडणे मुश्कील झाल्याचे अन्य एका रिक्षाचालकाने सांगितले. तर एरव्ही, १२०० रुपयांचा धंदा आता अवघा ७०० रुपयांवर आल्याचे अशोक जाधव या चालकाने ‘लोकमत’ला सांगितले.मास्क लावणे डोक्याला तापअनेक रिक्षाचालकांमध्ये कोरोनाची जागृती झाली आहे. त्यामुळे त्यांनी उत्स्फूर्तपणे तोंडावर मास्क लावण्यास सुरुवात केली आहे. तर, काहींना ते लावणे म्हणजे डोकेदुखी झाली आहे. आधीच वाढते तापमान, त्यात मास्क लावण्याने श्वास घेण्यात मोकळेपणा वाटत नाही. त्यामुळे अनेकांनी मास्क जवळ बाळगले आहे. पण, ते घालण्यात त्रासदायक असल्याचाही दावा केला आहे.
कोरोनाच्या धास्तीने रिक्षाचालकांचा व्यवसाय मंदावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 1:05 AM