ठाणे: सुमारे दीडशे वर्ष जुन्या असलेल्या पोर्तुगीज कालीन सिनेगॉग या धार्मिक स्थळाला स्फाेटकांनी तसेच बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल गुरुवारी आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. ठाणे बॉम्ब शोधक नाशक पथकाने या धार्मिक स्थळासह संपूर्ण परिसराची तपासणी केली. मात्र, कोणतीही संशयित वस्तू किंवा बॉम्ब आढळला नसल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.शहरातील नौपाडा पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सिनेगॉग या र्प्राना स्ळाच्या वेबसाईटवरील ईमेल द्वारे प्रार्थना स्थळांमध्ये स्फोटके लपवलेली आहेत आणि ती लवकरच वापरले जातील अशा पद्धतीचा संदेश पाठविण्यात आला होता.
प्रार्थना स्थळाच्या विश्वस्तांनी नौपाडा पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त गणेश गावडे, सहायक पोलिस आयुक्त प्रिया ढाकणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर, गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांच्यासह बॉम्ब शोधक नाशक पथकांनेही घटनास्ळी धाव ष्घेतली. तसेच ठाणे नगर, राबोडी पोलिस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यानीही याठिकाणी बंदोबस्तासाठी तपासणीसाठी धाव घेतली. पोलिसांच्या पथकांनी तात्काळ प्रार्थना स्थळ आतील परिसर व बाहेरील संपूर्ण परिसर हा निर्मनुष्य केला. तसेच ठाणे रेल्वे स्टेशन कडील वाहतूक आणि डॉक्टर आंबेडकर रोडवरील वाहतूक ही वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या मदतीने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अन्य मार्गाने वळविण्यात आली. यावेळी बॉम्बशोधक व नाशक पथकातील श्वान जॅकच्या मदतीने संपूर्ण सिनेगॉगची घातपात विरोधी तपासणी करण्यात आली.
दरम्यान, दुपारी १२.३० ते ३ अशी अडीच तास ही तपासणी झाली. मात्र, कोणतीही संशयित वस्तू अथवा बाँब सदृश्य वस्तू आढळून आले नसल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्षीरसागर यांनी सांगितले. सिनेगॉगला आलेला धमकीचा ई-मेल बनावट असल्याची खात्री झाल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सायबर सेलचे अधिकारी व पथक तसेच इतर तांत्रिक माहितीच्या सहाय्याने अधिक तपास करण्यात येत असून यातील आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.