ठाणे - माजी मंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याचा ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा धमकीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी देखील महेश आहेर यांच्यापासून मला आणि माझ्या कुटुंबियांना धोका असल्याचे सांगत ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना पत्र दिले आहे. महेश आहेर यांच्या व्हायरल झालेल्या चार ऑडिओ क्लिप देखील विक्रांत चव्हाण यांनी पोलिसांच्या रेकॉर्डवर आणल्या असून या क्लिपमध्ये महेश आहेर यांच्याकडून मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांचा एकेरी उल्लेख झाला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे. या संपूर्ण ऑडिओ क्लिपची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. ठाणे महापालिकेचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या आव्हाडांना धमकी दिल्याच्या कथित ऑडिओ क्लिपसंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अधिवेशनात मुद्दा उपस्थित केल्यानंतर यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी लावली आहे. त्यानंतर आता ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी देखील मला आणि माझ्या कुटुंबियांना महेश आहेर यांच्यापासून धोका असल्याचे ठाणे पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे. १५ मार्च रोजी महेश आहेर यांच्या चार ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या असून यामध्ये मुख्यमंत्री तसेच ठाणे पोलीस आयुक्तांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. तर निकम नावाचे पोलीस अधिकारी माझ्याकडून दोन कोटी रुपये मागत असून मुख्यमंत्र्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना सांगितल्यानंतर हेच अधिकारी तुमच्या केसांनाही धक्का लागणार नाही, तसेच मी माझ्यावर गावठी काट्याने फायरिंग करून ही फायरिंग आव्हाड यांनी केली अशी तक्रार करणार असे सर्व संभाषण आहेर या क्लिपमध्ये करत असल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे.
शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्य शासनाने याची त्वरित दखल घेऊन अटकसत्र सुरु केले. मात्र आम्ही महेश आहेर यांच्याविरोधात एवढे पुरावे देऊनही काहीच कारवाई होत नसून हे शासन गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे का ? या क्लिपमध्ये मुख्यमंत्र्यांचाही उल्लेख आहेर यांच्या तोंडून निघाला असून मुख्यमंत्र्यांनीही अजून या गोष्टी नाकारलेल्या नाहीत. त्यामुळे माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर राज्य शासन आणि मुख्यमंत्रीही जबाबदार असतील अशी माहिती जाहीर पत्रकार परिषदेत विक्रांत चव्हाण यांनी दिली.