मीरा रोड : पाण्यासाठी तहानलेल्या मीरा रोडच्या चंदे्रश अॅकॉर्ड इमारतीच्या रहिवाशांना पाण्यासाठी राजकारण्यांकडून केवळ खोटी आश्वासनेच मिळाल्याने लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. इतकेच नव्हे, तर प्रचारासाठी एकाही राजकीय पक्षाच्या उमेदवार, लोकप्रतिनिधी वा कार्यकर्त्यास इमारतीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. असा निर्धार रहिवाशांच्या बैठकीत करण्यात आला असून, त्यामुळे राजकारण्यांसह महापालिकेची अब्रूसुद्धा चव्हाट्यावर आली आहे.मीरा रोडच्या सिल्व्हर पार्कसमोर असलेल्या चंद्रेश अॅकॉर्ड या तीन मजली जुन्या इमारतीत १६ सदनिका असून, सुमारे सव्वाशे रहिवासी येथे वास्तव्यास आहेत. येथे पालिकेची एकच नळजोडणी आहे. त्यामुळे जेमतेम सात ते आठ हजार लीटर पाणी पालिकेकडून मिळते. त्यातही पाणीकपात असली की, तीन दिवस तेवढे पाणीसुद्धा मिळत नाही. परिणामी, पाण्याची प्रचंड टंचाई रहिवासी सहन करत आहेत.पाण्याची काटकसर करताना कपडे धुण्याचे पाणी लादी आणि शौचालयासाठी वापरावे लागते. आठवड्यातून प्रत्येक सदनिकाधारकास पाण्यासाठी किमान दोनवेळा, तरी टँकर मागवावे लागतात. एका टँकरसाठी ३०० ते ४०० रुपये मोजावे लागतात.पाणी पुरेशा दाबाने यावे म्हणून जानेवारी महिन्यात पालिका आणि लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरून मुख्य मार्गावरील मोठ्या जलवाहिनीवरून नळजोडणी घेण्यात आली होती. पण, निम्मे पाणीच मिळू लागल्याने पुन्हा अंतर्गत जलवाहिनीवरच नळजोडणी जोडली. या सर्व खटाटोपीत रहिवाशांना सुमारे ५० हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला.पालिकेच्या नियमानुसार १५ सदनिकांपर्यंत एक व त्यापेक्षा जास्त सदनिका असल्यास दोन नळजोडण्या दिल्या जातात. आमच्या इमारतीत १६ सदनिका असल्याने आणखी एका नळजोडणीसाठी पालिकेच्या खेपा मारूनसुद्धा नकार दिला जात आहे. स्थानिक आमदारानेसुद्धा आमच्या समस्येकडे दुर्लक्षच केल्याचे प्रमोद मिश्रा, बबन मोहिते आदी रहिवाशांनी सांगितले.२०१७ च्या पालिका निवडणुकीत २४ तास पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते; पण २४ तास तर सोडा, गरजेपुरते पाणीसुद्धा आजतागायत दिलेले नाही, असा आरोप रहिवाशांनी केला. अन्य इमारतींना दुसरी नळजोडणी मिळते, मग आमच्याच इमारतीवर अन्याय का, असा सवाल त्यांनी केला.>इमारतीच्या गच्चीवर रविवारी झालेल्या बैठकीत रहिवाशांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. मते मागायला येणाऱ्या एकही उमेदवार, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यास इमारतीत घ्यायचे नाही, असा निर्धार रहिवाशांनी केला. इमारतीबाहेर उमेदवार, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना प्रचारासाठी प्रवेशास मनाई असल्याचा फलक लावणार आहोत. रहिवाशांची बैठक बोलावून त्यात मतदानावर बहिष्कारासह अन्य मुद्यांचे ठराव करून घेणार आहोत.निवडणुकीनंतर उपोषण, धरणे, आंदोलने केली जातील, असा निर्धार मोहिते, मिश्रांसह परवेझ अन्सारी, अरुणा भट, दीपक छटबार, कांतिलाल जयस्वाल, दिनेश राजगुरू, धर्मू यादव, मोहन राजगुरू, कपूर आदी रहिवाशांनी केला आहे.
तहानलेल्या रहिवाशांनी दिला मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 1:12 AM