ठाणे : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.
गेल्या काही दिवसांपासून महिला आणि लहान मुलींवरील बलात्कार, विनयभंगांच्या गुन्ह्यांची संख्या वाढीस लागली आहे. गुन्हेगारांवर राज्याच्या गृहखात्याचा वचक नसल्याने अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे शहराध्यक्षा सुजाता घाग यांच्या नेतृत्त्वाखाली घंटानाद तसेच थाळीनाद केला. यावेळी महिलांनी युती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या नगरसेविका अपर्णा साळवी, राधाबाई जाधवर, अनिता किणे, अंकिता शिंदे, आरती गायकवाड यांच्यासह युवती अध्यक्षा प्रियंका सोनार, आदींसह इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. भाजप सरकारच्या काळात आता महिला व मुली सुरक्षित नसल्याचा आरोप सुजाता घाग यांनी केला...तर रस्त्यावर उतरूमहिलांना सुरक्षा देण्यात सरकार हतबल ठरले आहे. असुरक्षिततेमुळे भयभीत झालेल्या व अत्याचार पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष रस्त्यावरची लढाई लढणार असून यासाठी प्रत्येक महिलेने पेटून उठणे गरजेचे आहे. सरकारने या नराधमांवर वचक प्रस्थापित केला पाहिजे. अत्याचारांच्या घटनांमध्ये घट झाली नाही तर आम्ही या सरकारच्याच गळ्यात घंटा बांधून तिचा नाद करू, असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे शहर अध्यक्षा सुजाता घाग यांनी दिला.