जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे तसेच गडचिरोलीचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना भामरागड एरिया कमिटीच्या नावाने धमकीचे पत्र देण्याचा प्रकार कोणीतरी खोडसाळपणातून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळले आहे. ठाणे पोलिसांचे एक पथक गडचिरोलीत यासंदर्भात चौकशीसाठी गेले होते. या प्रकरणाची चौकशी सुरू राहणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
पालकमंत्री शिंदे यांना भामरागड एरिया कमिटीच्या नावाने तीन आठवड्यांपूर्वी पत्र आले आहे. यामध्ये ‘तुम्ही गडचिरोलीचा खूप विकास करीत आहात. पण आम्हाला मोठी समस्या निर्माण करीत आहात. पोलिसांच्या कारवाईत अनेक नक्षलवादी मारले गेले आहेत. याचा आम्ही नक्कीच बदला घेऊ,’ असा इशारा देण्यात आला होता. ठाण्यातील लुईसवाडीतील नंदनवन या निवासस्थानी आलेल्या पत्राची ठाणे आणि गडचिरोली पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली. या प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाकडून केला जात आहे. या पत्रावर दक्षिण मुंबईच्या पोस्ट कार्यालयाचा शिक्का आहे. मात्र, जिथून ते पाठविण्यात आले, त्या पोस्ट कार्यालयाचा शिक्का अस्पष्ट आहे. पत्रातील मजकूर मुंबई, ठाण्यातील भाषेप्रमाणे आहे. यामध्ये नक्षलवादी भाषेचा पुसटही उल्लेख नाही. शिवाय, नक्षलवाद्यांच्या धमकीची भाषा आणि पत्रातील भाषा यात बराच फरक आहे. त्यामुळे प्राथमिक तपासात हा कोणीतरी खोडसाळपणा केला असावा, किंवा मुंबई, ठाण्यातूनच कोणीतरी पालकमंत्री शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला असावा, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.
गेल्या काही महिन्यांत पालकमंत्र्यांनी गडचिरोली येथे विकासकामांचा धडाका लावला. त्याचप्रमाणे अनेक नक्षलवाद्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले. त्यामुळेच गडचिरोली आणि आसपासच्या परिसरातील नक्षलवादी नाराज असल्याचा सूर उमटला होता. पत्रातून धमकी कोणी आणि का दिली, याचा सर्वच बाजूंनी तपास सुरू असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.या धमकी प्रकरणाच्या तपासासाठी ठाणे पोलिसांचे एक पथक गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर येथेही चौकशीसाठी गेले होते. याबाबत अद्याप चौकशी सुरू आहे. अजून यात कोणालाही ताब्यात घेतले नाही. अंतिम निष्कर्षापर्यंत अजूनही तपास आलेला नाही. - लक्ष्मीकांत पाटील, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर