ठाणे : बांधकाम सुरू ठेवण्यासाठी ३० लाखांची खंडणी मागणाºया आणि त्याविरोधात पोलिसांत गेल्यास दोन बांधकाम व्यावसायिकांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणा-या अमित भोगले आणि अभिजित जाधव यांच्याविरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.रितेश कदम यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. ते आणि त्यांचा मित्र परेश पारकर हे डोंबिवलीतील जनार्दन कालण यांच्याशी भागीदारीत व्यवसाय करतात. मध्यंतरी कालण यांनी त्यांना व्यवहाराचे काही पैसे दिले. उरलेले देण्यास टाळाटाळ केली. त्यातून मार्ग काढण्यासाठी मंदार गावडे याने गेल्या वर्षी त्याचा मित्र अमित भोगले यांच्याशी त्या दोघांची ओळख करून दिली आणि अमित पैसे मिळवून देईल, असे सांगितले. चौकशीत भोगले गुन्हेगार असल्याचे समजल्याने त्यांनी व्यवहाराबाबत त्याला काही सांगितले नाही. पुन्हा कालण यांना भेटून व्यवहारातील पैशांची त्यांच्याकडे मागणी केल्यावर त्यांनी दोन लाख आणि सहा लाखांचे धनादेश दिले. त्यातील दोन लाखांचा धनादेश वटला, पण सहा लाखांचा धनादेश १८ आॅगस्ट २०१७चा असल्याने पैसे मिळाले नव्हते. तत्पूर्वी ७ आॅगस्टला भोगले याने गावडे यांच्या मोबाइलवर फोन करून कालण यांच्याकडून पैसे घेतले का? या पैशांबाबत मला सांगितले नाही, अशी विचारणा करत शिवीगाळ करून सहा लाखांची मागणी केली. ते पैसे दिले नाहीत तर तुमचे कल्याणला सुरू असलेले बांधकाम होऊ देणार नाही. तसेच तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली.पुन्हा १४ आॅगस्टला गावडेकडे निरोप पाठवून दोघांना बोलावून घेतले. भोगले आणि त्याचा साथीदार जाधव यांनी पुन्हा सहा लाखांची मागणी केली आणि ते न दिल्यास सोडणार नाही, अशी धमकी दिली. पारकर यांच्याकडून सहा लाखांचा धनादेश लिहून घेतला.
ठार मारण्याची धमकी देत केली ३० लाखांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 4:57 AM