कल्याण : उच्च न्यायालयाच्या आदेशाचे फेरीवाल्यांकडून उल्लंघन होत असताना दुसरीकडे केडीएमसीची फेरीवाला पथके मुजोर फेरीवाल्यांच्या दहशतीखाली वावरत असल्याचे चित्र आहे. कारवाईचा दावा जरी या पथकांकडून केला जात असला तरी कारवाईसाठी गेलेल्या कर्मचाºयांवर विनयभंगासारखे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या फेरीवाल्यांकडून दिल्या जात असल्याचे या कर्मचाºयांचे म्हणणे आहे.प्रसंगी हप्तेखोरीचा आळ घालू, असेही सुनावले जात असल्याने फेरीवाला हटविण्याची कारवाई करायची तरी कशी? असा सवाल कर्मचारी करत आहेत. याबाबत ते पालिका अधिकाºयांशी चर्चा करणार आहेत. मात्र या आरोपांबाबत फेरीवाल्यांच्या नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.न्यायालयाच्या आदेशानुसार कल्याण-डोंबिवली महापालिका परिक्षेत्रात पांढरे पट्टे मारून रेल्वे स्थानकापासून १५० मीटरच्या परिसरात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. महापालिकेने लक्ष्मण रेषा आखली असली तरी ती ओलांडून बिनदिक्कत फेरीवाल्यांचा व्यवसाय सुरू असल्याचे कल्याण-डोंबिवलीत पहावयास मिळते. फेरीवाल्यांचा हा व्यवसाय फेरीवालाविरोधी पथकांच्या समोरच थाटला जात असल्याने पथकांचा त्याला आशीर्वाद लाभल्याचे स्पष्ट होते. त्याचवेळी फेरीवाल्यांकडून पथकातील कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या सर्रास दिल्या जात आहेत.कर्मचारी कारवाईसाठी गेला, तर विनयभंग आणि हप्तेखोरीच्या प्रकरणात अडकवू अशा प्रकारची दहशत फेरीवाल्यांकडून पसरवली जात आहे. हप्तेखोरीच्या नादात फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही, असे जरी बोलले जात असले तरी फेरीवाल्यांच्या अशाप्रकारे दहशत पसरविण्याच्या प्रकारात एखाद्या प्रामाणिक कर्मचाºयाचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. न्यायालयाच्या आदेशामुळे सध्या राजकीय दबाव येत नाही. परंतु फेरीवाल्यांच्या या धमक्या पाहता कारवाईवर काही प्रमाणात मर्यादा पडत आहेत.कारवाईच्या वेळी पोलीस बंदोबस्त पुरेसा मिळत नाही. पूर्वी फेरीवाला पथकामध्ये १५ कर्मचारी असायचे, सध्या हा आकडा ८ ते १० च्या आसपास आला आहे. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा वाढता विळखा पाहता ठिकठिकाणी होणाºया अतिक्रमणांना थोपवायचे तरी कसे असा यक्षप्रश्न पथकांना पडला आहे. आमच्या रोजीरोटीवर आलात तर तुमचीही नोकरीही कशी शाबूत राहते हे पाहू, अशा शब्दातही कर्मचाºयांना धमकावले जात आहे.महापालिकेच्या कारवाईमुळे स्थानिक फेरीवाल्याच्या रोजगारावर टाच आल्याचा आरोप होत असला तरी याठिकाणी भायखळा, कुर्ला, चेंबुर. मुंब्रा या ठिकाणाहून येणाºया फेरीवाल्यांच्या दहशतीचे नमुने सातत्याने पाहावयास मिळत आहेत.
धमक्यांचे सत्र : कारवाई करणारी पथके फेरीवाल्यांच्या दहशतीखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 11:49 PM