कल्याण : डोंबिवली औद्योगिक परिसरात तीन वर्षांत १८ दुर्घटना घडलेल्या आहेत. या घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. ही बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. दरम्यान, प्रोबेस कंपनीत भीषण स्फोट झाला होता. या स्फोटानंतर केलेल्या चौकशी अहवालानुसार काही शिफारसी केल्या होत्या. या अहवालाच्या शिफारशींची अंमलबजावणीच केलेली नाही. हा अहवालच थंड बस्त्यात गुंडाळून ठेवला आहे.
जागरूक नागरिक राजू नलावडे यांनी ही माहिती उघड केली आहे. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडे नलावडे यांनी माहिती मागितली होती. एप्रिल २०१६ ते एप्रिल २०१९ या दरम्यान घडलेल्या घटनांची माहिती मागवण्यात आली होती. नलावडे यांना दिलेल्या माहितीत तीन वर्षांत १८ घटना घडलेल्या आहेत. या घटनांमध्ये २१ जणांचा मृत्यू झाल्याची बाब यातून उघड झाली आहे. अपघात आणि दुर्घटना घडलेल्या कारखान्यांच्या विरोधात कारखाने अधिनियमानुसार न्यायालयात खटले दाखल केले आहेत. २६ मे २०१८ रोजी सागाव येथील प्रोबेस कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.एका महिन्यात चौकशी अहवाल तयार करणे अपेक्षित होते. तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रकांत कल्याणकर यांनी चौकशी अहवाल तयार करण्यास तब्बल एक वर्षाचा कालावधी लावला. याप्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयाकडून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. इतक्या गंभीर घटनेचा चौकशी अहवाल तयार करण्यात विलंब का झाला याचा जाबही कधी विचारला नाही. चौकशीचा अहवाल २४ जुलै २०१७ रोजी राज्य सरकारकडे सादर करण्यात आला. सरकारला अहवाल सादर होऊन दोन वर्षे उलटली तरी अद्याप त्यासंदर्भात काहीच अंमलबजावणी केलेली नाही. अहवालात दिलेल्या शिफारशींची अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. प्रोबेस कंपनीच्या भीषण स्फोटासारखे जीवघेणे स्फोट पुन्हा होऊ नयेत यासाठी या शिफारसी चौकशी समितीने केल्या होत्या. इतकेच काय हा चौकशी अहवाल राज्य सरकारला सादर केला असला तरी तो कल्याणच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे.
डोंबिवली औद्योगिक परिसरात जवळपास ४३२ कारखाने आहे. त्यात रासायानिक, कापड उद्योग प्रक्रिया, औषधे तयार करणारे आणि इंजिनीअरिंग कारखान्यांचा समावेश आहे. रासायनिक कारखान्यात स्फोटाच्या शक्यता जास्त आहेत. त्याचबरोबर ४३२ कारखान्यांपैकी पाच कारखाने हे अतिधोकादायक आहेत. ही माहिती कल्याण औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने दिली आहे. सगळेच कारखाने इतरत्र हलवणे शक्य नसल्याने किमान हे पाच अतिधोकादायक कारखाने इतरत्र हलवले जावेत, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.नुकसानग्रस्तांच्या तोंडाला पुसली पानेनागरीकरणामुळे औद्योगिक परिसर आणि निवासी परिसर यांच्यातील बफर झोनचा निकष पाळला गेलेला नाही. निवासी परिसरात रुग्णालये, शाळा, कॉलेज आदी आहेत. प्रोबेस कंपनीचा स्फोट हा मे महिन्यात झाला होता. त्यावेळी शाळेला सुटी होती. त्यामुळे मुले बचावली होती. प्रोबेस स्फोटाची भीषणता इतकी मोठी होती की आसपासच्या दोन हजारपेक्षा जास्त मालमत्तांचे नुकसान झाले होते. त्यांचे पंचनामे केले गेले. महसूल खात्याकडून ते मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवले गेले. या नुकसानग्रस्त मालमत्ताधारकांना सात कोटी ४५ लाख रुपये नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित होते. ही नुकसानभरपाई देण्याबाबत सरकारने चक्क त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.