नालासोपारा (मंगेश कराळे) :- घरफोडी चोरी करणाऱ्या तीन सराईत आरोपींना अटक करण्यात नालासोपाऱ्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी दोन आरोपीकडून २ आणि एका आरोपीकडून ६ असे ८ गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी सोमवारी दिली आहे.
नालासोपारा येथे राहणारे शहरब गाझी यांच्या घरी ४ सप्टेंबरला रात्री चोरट्याने घराची कडी कशाने तरी कापून घरातील १६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदारांनी गुन्हयाचा तपास सुरु केला. अनोळखी आरोपीबांबत काही एक माहिती नसताना प्राप्त पुरावे व तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हयाचा तपास करून आरोपी जुनेद अब्दुलकैस खान (२८) आणि मोहम्मद यासीन पप्पु शेख (२६) या दोघांना ५ सप्टेंबरला अटक केली. अटक आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीकडून गुन्हयातील गेलेला सर्व ऐवज हस्तगत करून दोन गुन्ह्यांची उकल केली. त्याचप्रमाणे आरोपी बाबु देवा सादरा (१९) यालाही ५ सप्टेंबरला अटक केली आहे. त्याचेकडून गुन्हयातील गेलेला माल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीकडे अधिक चौकशी केल्यावर त्याने ६ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पांडे, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मोकाशी, नालासोपाऱ्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन कोतमिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंडीत मस्के, पोलीस हवालदार किशोर धनु, हिरालाल निकुंभ, प्रशांत साळुंके, अमोल तटकरे, राजेश नाटुलकर, कल्याण बाचकर, प्रेम घोडेराव यांनी केली आहे.