ठाणे : कोपरी येथील हर्षद गायकवाड याचे पूर्ववैमनस्यातून कोपरीतील दहा जणांच्या टोळीने अपहरण केले होते. कळवामार्गे त्याला पळवून नेत असताना त्याने रिक्षातून उडी मारून जवळच्या एका इमारतीत धाव घेतली. त्याला सोडविण्यासाठी गेलेल्या विराज परब (४०) यांच्यावरच खुनीहल्ला झाल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी सनी तेलोरे (२१), अरिफ छप्परबंद (१९) आणि सनी कांबळे (१९) या तिघांना कळवा पोलिसांनी अटक केली आहे.
हर्षदला शोधण्यासाठी रिक्षातील सनी तेलोरे याच्यासह त्याचे साथीदार हे एका इमारतीत १९ फेब्रुवारी रोजी जात होते. त्याचवेळी तेथील एक सुरक्षा रक्षक विराज परब यांनी त्यांना अडविले. यातूनच विराजबरोबर त्या टोळक्याची बाचाबाचीही झाली. यावरून इमारतीतील काही तरुणांनी कोपरीच्या या टोळक्याला जाब विचारला. तोपर्यंत तिथे कळवा पोलीस ठाण्याचे काही कर्मचारीही पोहोचले. तरीही या टोळक्याने परब यांच्यावर चॉपरने खुनी हल्ला केला. विराज या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. हल्ला करणारे तेलोरे, अरिफ आणि सनी कांबळे यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण बगडाणे यांच्या पथकाने १९ फेब्रुवारी रोजी अटक केली. या तिघांनाही २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले होते. खुनीहल्ल्याचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या हल्ल्यातील इतर आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे कळवा पोलिसांनी सांगितले.