भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना 3 जानेवारी रोजी घडली होती. या घटने प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. विकी उर्फ सोनू प्रकाश म्हात्रे (२५) धंदा- डंपर ड्रायव्हर, रा. कालवार, तर प्रथम किशोर भोईर (२०) रा. डोंबीवली आणि वैभव विजय भोकरे (२५) रा. काल्हेर ता. भिवंडी, अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या राजकीय वर्चस्वाच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांनी दिली. २ जानेवारी रोजी म्हात्रे हे पत्नीसह घरासमोरील परिसरात आपल्या भावाने घेतली गाडी बघत होते. तेव्हाच अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. मात्र, म्हात्रे यांनी प्रसंगावधान राखत गोळी चुकवली आणि पत्नीलाही सुरक्षित ठिकाणी नेले. या घटने प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस व गुन्हे शाखेचे पथक या घटनेचा समांतर तपास करीत होते. गुन्हे शाखा भिवंडी युनिटच्या पथकाने गुप्त बातमीदारामार्फत या घटनेतील आरोपींबाबत माहिती मिळवली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली.अटकेतल्या आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्याच पक्षाचे वर्चस्व राहावे या कारणातून विकी उर्फ सोनू प्रकाश म्हात्रे आणि त्याचे साथीदार यांनी दीपक म्हात्रे यांच्यावर गोळीबार केल्याचे पोलीस तपासातून समोर आल्याची माहिती येनपुरे यांनी दिली.
भिवंडी शिवसेना शाखाप्रमुखावरील गोळीबार प्रकरणी तिघे ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2021 10:32 PM