मीरारोड : भाईंदरच्या उत्तन येथील सरकारी जागेत घर बांधणाऱ्या महिलेस कारवाईची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली.
सरकारी जागेवरील अतिक्रमणाकडे महसूल विभागासह महापालिकेच्या होणाऱ्या दुर्लक्षामुळे अनधिकृत बांधकामे मोठ्या संख्येने वाढत असून, यातून मोठ्या प्रमाणात वसुलीचे प्रकार वाढीस लागले आहेत.
उत्तनच्या सरकारी जागेतील लालबहादूर शास्त्री नगरमध्ये एका महिलेने झोपडी पक्की करण्याचे काम सुरू केले होते. यावेळी भाईंदरला राहणाऱ्या विनोद नाईक याने बांधकामाचे फोटो काढत परवानगीची विचारणा केली व धमकावले. नाईकचा साथीदार गोवर्धन पाटील याने आपण पालिकेच्या अतिक्रमण विभागाचा अधिकारी असल्याचे सांगत १५ हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीत, तर बांधकाम तोडण्याची धमकी दिली.
घाबरून महिलेने पाटील याला पाच हजार रुपये दिले. आणखी पाच हजार रुपये ऑनलाइन जमा केले; परंतु उर्वरित पैशांसाठी पाटील याने तगादा लावला. अखेर महिलेने पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याकडे तक्रार केली. काळे यांच्या निर्देशावरून उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत लांगी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी उत्तन नाका येथे सोमवारी सापळा रचला. पाटील हा अरबाज आसीफ खान याच्यासह दुचाकीवरून आला. महिलेकडून दोन हजार रुपयांची खंडणी घेताना पाटील व खान यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. विनोद नाईकला अटक केल्याचे सूत्रांनी सांगितले. नाईकवर अन्य काही गुन्हे दाखल असून, तो अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडून खंडणी वसुली करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
...........
वाचली