ठाणे : लोकल प्रवासात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने खेचून पसार झालेल्या परप्रांतीय टोळीतील अमन खरवार (१९, रा. वाराणसी) याच्यासह तिघांना लोहमार्ग गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केल्याची माहिती लोहमार्ग विभागाचे पोलिस उपायुक्त मनोज पाटील यांनी शुक्रवारी दिली. त्यांच्याकडून एक लाख नऊ हजार १८० रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
डोंबिवलीतील २९ वर्षीय महिला ६ ऑक्टोबर २०२३ रोजी डोंबिवली रेल्वे फलाट क्रमांक दोनवरील परेल धीम्या लोकलच्या कल्याण बाजूच्या डब्यातून रात्री ११.२० च्या सुमारास प्रवास करीत होती. त्याचदरम्यान, कळवा रेल्वे स्थानकात ही उपनगरी रेल्वे आली असता, चोरट्याने तिची सोनसाखळी खेचून धावत्या लोकलमधून खाली उडी मारुन पळ काढला होता. याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. असाच एक जबरी चोरीचा प्रकार बांद्रा लोहमार्ग पोलिस ठाण्यात १४ ऑक्टोबर २०२३ रोजी दाखल झाला होता.
बांद्रा रेल्वे स्थानकातून जाणाऱ्या रेल्वेतील ३० वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरटा पसार झाला होता. रेल्वेचे पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी लोहमार्ग गुन्हे शाखेला दिलेल्या आदेशानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक होळकर, जमादार गजानन शेडगे, रवींद्र दरेकर आणि संदीप गायकवाड आदींच्या पथकाने समांतर तपास करीत कळवा ते दादर आणि बांदा रेल्वे स्टेशन येथील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. हे दोन्ही गुन्हे एकाच आरोपीने केल्याचे आढळले.
वाराणसी येथे जाऊन साथीदाराला अटक
आरोपींच्या परतीच्या प्रवासाचा तपास करीत पोलिसांनी कळवा रेल्वे स्टेशन येथील गुन्ह्याच्या घटनास्थळी तांत्रिक विश्लेषण केले. त्याचआधारे अमन खरवार यास रबाळे, नवी मुंबई येथून अटक करण्यात आली. चौकशीत त्याने हे दोन्ही गुन्हे त्याचा साथीदार रोहित यादव आणि विवेक यादव (रा. तिघेही चौबेपूर, वाराणसी, उत्तरप्रदेश ) यांच्यासह केल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने वाराणसी येथे जाऊन आरोपी रोहित याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५३ हजार १८० रुपयांचे दहा ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र आणि बांद्रा येथील चोरीतील ५६ हजारांची दहा ग्रॅम वजनाची एक सोनसाखळी हस्तगत करण्यात आली.