लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : उत्तर प्रदेशहून येणाऱ्या नातेवाइकांना घेण्यासाठी आलेल्या दोन भावांना तिघांनी लुटल्याची घटना कल्याण रेल्वेस्थानकात नुकतीच घडली होती. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींना जेरबंद करण्यात कल्याण रेल्वेच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना मंगळवारी रात्री उशिराने यश आले. श्रेयस कांबळे, आकाश माने आणि रूपेश कनोजिया, अशी आरोपींची नावे असून, पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेले मोबाइल हस्तगत केले आहेत.
कल्याण पूर्वेत राहणारा नीरज वर्मा हा तरुण त्याच्या चुलत भावासोबत कल्याण रेल्वेस्थानकात पूर्वेतील रेल्वे तिकीट घराजवळ बसला होता. नीरजचे मामा उत्तर प्रदेशहून कल्याणला येत होते. ते दोघे त्यांना घेऊन जाण्यासाठी गाडीची वाट पाहत होते. यादरम्यान तीन तरुण या दोघांच्या जवळ आले. या तिघांनी चाकूचा धाक दाखवीत नीरज व त्याच्या भावाकडून मोबाइल हिसकावून घेत पळ काढला. या घटनेप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
लोहमार्ग पोलिसांसोबत कल्याण रेल्वे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीसही आरोपींचा शोध घेत होते. अखेर पोलिसांनी कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी परिसरात राहणाऱ्या तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. कल्याण रेल्वे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी अशरुद्दीन शेख यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
कनोजियाविरोधात गंभीर गुन्हे
शेख म्हणाले की, तिघा आरोपींपैकी कनोजिया याच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सीसीटीव्हीच्या साहाय्याने तिघांना अटक केली आहे. या तिघांनी आतापर्यंत आणखी किती लोकांना लुटले याचा तपास सुरू आहे.
-------------