ठाणे : दुर्मिळ वन्यप्राणी असलेल्या खवले मांजराच्या खवल्यांची ४० लाखांमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या विक्रम तुकाराम जाधव (४०, रा. नेरुळ, नवी मुंबई) याच्यासह तिघा तस्करांना मुंब्रा पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. त्यांच्या ताब्यातून सुमारे अडीच किलो वजनाची ८० ते ९० खवलेही हस्तगत करण्यात आली आहे.मुंब्रा रेतीबंदर पारसिक सर्कल, अमित गार्डन हॉटेलजवळ काळ्या जादूसाठी, तसेच औषधी गुणधर्मासाठी प्रचलित असलेल्या खवल्या मांजराचे खवले विक्रीसाठी तिघेजण आणणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संजय गळवे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गळवे यांच्यासह पोलीस हवालदार सुदाम पिसे, पोलीस नाईक अमोल कदम, तुषार पाटील, पोलीस शिपाई उमेश राजपूत, भूषण खैरनार आणि सुनिल वाघमारे आदींच्या पथकाने २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सापळा लावून मुंब्रा रेती बंदर पारसिक सर्कलजवळ विक्रम जाधव याच्यासह बाळकृष्ण जोगळे (४९, रा. भिवंडी) आणि अनिल घाडगे (४५, रा. सातारा) या तिघा संशयितांना त्यांनी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीमध्ये एका हिरव्या रंगाच्या बॅगमध्ये ही मौल्यवान खवले हस्तगत करण्यात आली. ही खवले ते ४० लाखांमध्ये विक्री करणार होते, अशी कबुलीही त्यांनी दिली. मुंब्रा पोलीस ठाण्यात याप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनाही १ आॅक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.