लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पोखरण रोड क्रमांक दोन येथील एका महिलेच्या गळयातील सोनसाखळी जबरीने चोरुन पलायन करणाºया ऋतिक सितापराव (१९), वैभव गवळी उर्फ बच्ची (२६) आणि राकेश गुरुदासानी उर्फ राक्या (२६) या तिघांना चितळसर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांना १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.गांधीनगर येथे राहणारी मंजू आलम (४३) ही घरकाम करणारी महिला १५ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास पोखरण रोड क्रमांक दोन येथील हनुमान मंदिरासमोरील रस्त्याने घरी जात होती. त्यावेळी मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांनी तिच्या गळयातील सोनसाखळी खेचून पलायन केले होते. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रण तसेच खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड आणि कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक वाघ यांच्या पथकाने या तिन्ही आरोपींचा शोध काढला. तेंव्हा या तिन्ही आरोपींना नौपाडा पोलिसांनी अशाच एका गुन्हयात याआधी अटक केल्याची बाब समोर आली. ते न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्यांना कारागृहात ठेवण्यात आले होते. त्याअनुषंगाने न्यायालयाच्या परवानगीने या तिघांनाही चितळसर पोलिसांनी २९ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या कोशल्यपूर्ण चौकशीमध्ये त्यांनी या गुन्हयाची कबूली दिली. याशिवाय, कापूरबावडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार राजेंद्र पारधी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्याने वरील साथीदारांसह जबरी चोरी आणि घरफोडीचे पाच गुन्हे केल्याची कबूली दिली. यात चितळसरचे तीन तर कापूरबावडी आणि रबाळे पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका गुन्हयाचा समावेश आहे. त्यांच्याकडून एक लाख ३२ हजारांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
ठाण्यात जबरीने सोनसाखाळी चोरणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 8:55 PM
पोखरण रोड क्रमांक दोन येथील एका महिलेच्या गळयातील सोनसाखळी जबरीने चोरुन पलायन करणाºया ऋतिक सितापराव , वैभव गवळी उर्फ बच्ची आणि राकेश गुरुदासानी उर्फ राक्या या तिघांना चितळसर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांनी पाच गुन्हयांची कबूली दिली आहे.
ठळक मुद्दे कापूरबावडी आणि चितळसर पोलिसांची कामगिरी एक लाख ३२ हजारांचे दागिने हस्तगत