ठाणे: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने नवी मुंबईतील तुर्भे भागातून बनावट विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या तेरसिंग कनोजे (३२, वाहन चालक, रा. सेंदवा, मध्यप्रदेश) याच्यासह तिघांना नवी मुंबईतील तुर्भे भागातून सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्यांच्याकडून ६० लाखांच्या विदेशी बनावट मद्यासह दोन मोबाईल आणि एक १२ चाकी ट्रक असा ७४ लाख आठ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाण्याचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांनी दिली.
अवैध, बनावट आणि परराज्यातून येणाऱ्या मद्यावर कारवाईचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते. याच पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्कचे कोकण विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे आणि ठाण्याचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याचे कोकण विभागीय भरारी पथक बेलापूर मार्गावर पाळत ठेवून होते. त्यावेळी या पथकाला ४ सप्टेंबर २०२३ रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास तुर्भे रेल्वे स्थानकासमाेरील रस्त्यावर एक संशयास्पद ट्रक आढळला. या ट्रकचा निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक विजय धुमाळ, संदीप जरांडे, जमादार मनोज होलम आणि जवान नारायण जानकर आदींच्या पथकाने पाठलाग करून त्याला थांबवले. या ट्रकची पाहणी केली असता, त्यात गोवा राज्यामध्ये निर्मित व फक्त गोवा राज्यातच विक्रीस परवानगी असलेल्या तसेच महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेल्या विदेशी मद्याचे ९१८ बॉक्स आढळले. त्यात व्हिस्की, बियरसह इतर मद्याचे प्रकारही होते. या प्रकरणी ट्रक चालक तेरसिंग याच्यासह त्याचे साथीदार नासिर शेख (४५, सेंधवा, मध्य प्रदेश) आणि गुड्डू रावत (रामुखेडी, जिल्हा इंदोर, मध्य प्रदेश) या तिघांना अटक केली आहे. मदयाची वाहतूक करण्यासाठी वापरलेला ट्रक आणि दोन मोबाईलही उत्पादन शुल्क विभागाने जप्त केले आहे.