अंबरनाथ: संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारा बारवी धरणात 98 टक्के पाणीसाठा झाला असून बारवी धरणाच्या अकरा दर स्वयंचलित दरवाजांपैकी तीन दरवाजे उघडले गेले आहेत या तीन दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे अद्यापही धरण शंभर टक्के भरले नसले तरी येत्या दोन दिवसात हे धरण 100 टक्के भरेल असा अंदाज एमआयडीसी च्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारं बारवी धरण अखेर काठोकाठ भरले आहे.
बारवी धरण क्षेत्रात जुलै महिमाखेर झालेल्या मुसळधार पावसानं हे धरण ५० टक्क्यांवरून थेट ८५ टक्क्यांपर्यंत भरले होते. मात्र संपूर्ण ऑगस्ट महिना पावसाने दडी मारल्यामुळे धरण भरू शकले नाही. हे धरण २०२० मध्ये ३१ ऑगस्ट रोजी ओव्हरफ्लो झाले होते. गेल्या आठवड्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हे धरण 98 टक्के भरले असून या धरणातील अकरा स्वयंचलित दरवाजेपैकी तीन दरवाजे हे आपोआप उघडले आहेत. त्यातून पाण्याचा विसर्ग देखील सुरू झाला आहे. गेट नंबर सात, आठ आणि नऊ हे तीन दरवाजे उघडले असून येत्या दोन दिवसात हे धरण 100 टक्के भरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. धरण 98 टक्के भरले नंतरही धरणाचे दरवाजे उघडल्याने हे धरण शंभर टक्के भरले असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे. मात्र प्रत्यक्षात हे धरण 98 टक्के भरले असून पाण्याचा दाब वाढल्याने हे दरवाजे उघडले गेले. बारवी धरणातून ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महापालिकांसह अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिका तसंच एमआयडीसी आणि स्टेम या प्राधिकारणांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या धरणाच्या पाणीसाठ्यावर ठाणे जिल्ह्याची तहान अवलंबून असते.