लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोपरीसह ठाणे शहरातील विविध ठिकाणी चोरी करणाºया कुणाल जगताप (२४, सिद्धार्थनगर, ठाणे) याच्यासह तीन अट्टल चोरटयांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट पाचच्या पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून सात चोऱ्यांमधील तीन लाख २४ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोपरीतील रहिवाशी वसंत चव्हाण यांच्या घरातून १२ डिसेंबर २०२० रोजी तीन लाख नऊ हजारांच्या सोने चांदीच्या दागिन्यांची चोरी झाली होती. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात १३ डिसेंबर रोजी गुन्हा दाखला झाला होता. या चोरीबाबत कोणताही धागादोरा नसतांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी खबºयांच्या मार्फतीने अत्यंत कौशल्याने आरोपींची माहिती मिळवून १८ डिसेंबर रोजी यातील कुणाल जगताप आणि अमित जगताप (२६, रा. सिन्नर जि. नाशिक) यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दीड लाखांचे ११२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ५०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने हस्तगत केले. हे दोघेही आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध चोरी तसेच जबरी चोरीचे ५० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. अमित जगताप याला तर ठाणे रेल्वे पोलिसांनी तडीपार केले आहे. या दोघांनाही अधिक तपासासाठी कोपरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.त्याचबरोबर अन्य एका घरफोडीतील आरोपी दीपक धनवाल हा ठाण्यातील यशोधननगर येथे येणार असल्याची ‘टीप’ पोलीस हवालदार दिलीप शिंदे यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांच्या पथकाने यशोधननगर येथे सापळा लावून दीपक (२८, रा. लोकमान्यनगर, ठाणे ) याला शिताफीने ताब्यात घेतले. सखोल चौकशीमध्ये त्याने वर्तकनगर येथील चोरीसह कोपरी आणि श्रीनगर परिसरात पाच घरफोडीचे आणि एका रिक्षा चोरीची कबूली दिली. त्याच्याकडून या रिक्षासह सोने चांदीचे दागिने आणि इतर सामान तसेच काही रोकड असा एक लाख ७३ हजार ६५० रुपयांचा ऐवज हस्स्तगत केला आहे. जमादार शरद तावडे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
ठाण्यात चोरी करणाऱ्या अट्टल तीन चोरटयांना अटक: सात गुन्हयांची उकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 6:02 PM
ठाणे शहरातील विविध ठिकाणी चोरी करणाºया कुणाल जगताप (२४, सिद्धार्थनगर, ठाणे) याच्यासह तीन अट्टल चोरटयांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट पाचच्या पथकाने नुकतीच अटक केली आहे.
ठळक मुद्दे तीन लाख २४ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी