ठाणे : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील सीसी कॅमेरे बंद केल्याप्रकरणी विस्तार अधिका-यासह दोन शिपाई कर्मचा-यांना जिल्हा परिषदेने जबाबदार धरले. जाणूनबुजून कॅमेरे बंद ठेवल्याचा ठपका ठेवून त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली. मात्र, आवकजावक रजिस्टरची पाने फाडण्यासारख्या गंभीर गैरप्रकार करणाºयांविरुद्ध कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून कोणत्याही हालचाली दिसून आल्या नाही.कार्यालयीन वेळेनंतर शिक्षण विभागाचे कॅमेरे काही वेळ बंद असल्याचे वृत्त ‘अधिकारी-कर्मचारी सीसीटीव्हीत कैद’ या मथळ्याखाली लोकमतने १८ जुलै रोजी प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली पथक नियुक्त करून चौकशी केली. चौकशीअंती तीन जणांना जबाबदार ठरवण्यात आले. मात्र, कॅमेरे बंद झाल्याच्या कालावधीत रात्री उशिरापर्यंत कार्यालयात बसलेल्यांची चौकशी प्रशासनाकडून अपेक्षित होती. मात्र, त्यांची साधी विचारपूसही करण्यात आली नसल्याची चर्चा जिल्हा परिषद आवारात आहे.या सीसी कॅमेरे बंदप्रकरणी पथकाने केवळ कार्यालयातील कॅमेºयांची तपासणी करून त्याच अनुषंगाने कारवाई केली. वास्तविक, कॅमेरे बंद असतानाच्या कालावधीत कार्यालयाबाहेर जाणºयायेणाºयांना पथकाने विचारात घेऊन अहवाल तयार करणे अपेक्षित होते. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरील कॅमेºयाचे फुटेजही तपासण्याची गरज होती.त्यातून काही ठोस कारणे समोर आली असती, अशी चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात रंगली आहे. याशिवाय, दस्तऐवजाची सत्यता पडताळण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या आवकजावक रजिस्टरची पाने फाडल्याप्रकरणी चौकशी करण्याबाबत प्रशासन सुस्त दिसत आहे. हा प्रकार होऊन तीन महिने उलटले असतानाही त्याविषयी कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्यामुळे जिल्हा परिषदेत उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.
सीसी कॅमेऱ्यांच्या प्रकरणात तिघांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 2:30 AM