कल्याण : बँक कर्मचारी असल्याची बतावणी करून भामट्यांनी फोनवरून एटीएम कार्डचा पिन नंबर विचारून आॅनलाइनद्वारे तिघांना पावणेदोन लाखांचा गंडा घातल्याच्या तीन घटना कल्याणमध्ये उघडकीस आल्या आहेत.सध्या नोटाबंदीमुळे आॅनलाइन यंत्रणांचा वापर वाढला आहे, पण त्या व्यवहारांबाबत पुरेशी जागरूकता नसल्याने फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. दीपक शर्मा या भामट्याने शनिवारी सकाळी धीरेन प्रजापती (४०, रा. अपाजीधाम बिल्डिंग, आधारवाडी) यांना फोन करत बँकेच्या मुख्य कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. एटीएमकार्ड बंद झाल्याने नवीन कार्ड नंबर देण्यासाठी त्याने धीरेन यांच्याकडे जुना कार्ड नंबर मागितला. त्यावर विश्वास ठेवत धीरेन यांनी डेबिटकार्ड नंबर दिला. मात्र, चोरट्यांनी आॅनलाइनद्वारे त्यांच्या खात्यातील ४० हजार रुपये काढून घेतले. दीपकने अशाच पद्धतीने गणेश सोनकांबळे (२०, रा. विजया निवास, मोहने) यांच्या बँक खात्यातून ६४ हजार ७९५ रु पयांचा अपहार केला. या दोन्ही घटनांप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात दीपक शर्माविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.तिसरी घटना सोमवारी सकाळी कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. रूपेश इंगळे (२३, रा. आनंदवाडी, कल्याण) यांच्याकडून भामट्याने पिन नंबर विचारत त्यांच्या खात्यातून ५७ हजार ३६९ रुपयांचा अपहर केला. या तिन्ही प्रकरणांचा पोलीस तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)पोलिसांत तक्रार कराअशा प्रकारे कोणत्याही बँकेतून फोन करून कोणतीही व्यक्ती एटीएम, डेबिट किंवा क्रेडिटकार्डचा पिन नंबर मागत असल्यास ग्राहकांनी तो देऊ नये. त्याऐवजी जवळचे पोलीस ठाणे गाठून तक्रार करावी किंवा संबंधित बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
आॅनलाइनद्वारे तिघांची फसवणूक
By admin | Published: December 30, 2016 4:12 AM