उल्हासनगर : फेब्रुवारी ते मे २०१९ च्या दरम्यान चुकीच्या मालमत्ता करनिर्धारणामुळे पालिकेला तब्बल तीन कोटींचे नुकसान सोसावे लागल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात आयुक्तांनी तीनसदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली आहे. ही समिती ३० दिवसांत अहवाल सादर करणार आहे. तसेच तत्कालीन विभागप्रमुखाच्या आदेशावरील सही पडताळणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवली आहे.
उल्हासनगर महापालिका मालमत्ताकर विभाग नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. विभागातील गैरव्यवहारांप्रकरणी तत्कालीन उपायुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांवर यापूर्वी गुन्हे दाखल झालेले आहेत. आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे चुकीच्या करनिर्धारणाबाबत तक्रार आल्यानंतर फेबु्रवारी ते मे २०१९ च्या दरम्यान महापालिकेचे अंदाजे अडीच ते तीन कोटींचे नुकसान झाल्याचे लक्षात आले आहे. यासंदर्भात आयुक्तांनी या करनिर्धारण घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देत मुख्य लेखापरीक्षक मंगेश गावडे यांच्या अध्यक्षतेखाली २ नोव्हेंबरला समिती नेमली. यामध्ये मालमत्ताकर विभागाचे उपायुक्त मदन सोंडे आणि विधी विभागाचे प्रमुख राजा बुलानी हे सदस्य आहेत.दरम्यान, तत्कालीन विभागाचे प्रमुख युवराज भदाणे यांच्या विनंतीवरून करनिर्धारणा आदेशावरील त्यांची सही तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे आयुक्तांनी पाठवली आहे. या आदेशावरील सही बनावट असल्याचा दावा भदाणे यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे हे प्रकरण येत्या महासभेत लावून धरणार आहेत. युवराज भदाणे हे नेहमी वादग्रस्त राहिले असून त्यांच्या बंद केबिनमध्ये सापडलेल्या कागदपत्रांची चौकशीही अद्याप पूर्ण झालेली नाही. याबाबत बोडारे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सही पडताळणीनंतर सत्य पुढे येईल, अशी प्रतिक्रिया भदाणे यांनी दिली आहे.आयुक्तांच्या भूमिकेकडे लागले लक्षच्महापालिका महासभेत मालमत्ताकर विभागातील घोटाळे उघड करणार असल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी सांगितले.च्तसेच यापूर्वीच्या घोटाळ्यांवरही चर्चा होणार असल्याने त्यावर पालिका आयुक्त सुधाकर देशमुख काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.