ठाणे : करोडो रुपयांची बोगस बिले सादर करून सीजीएसटी कायद्यांतर्गत करभरणा टाळणा-या तिघांना ठाण्याच्या केंद्रीय विक्रीकर विभागाने अलीकडेच अटक केली. या व्यापा-यांनी सुमारे ६० कोटींच्या कराचा अपहार केल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.मुख्य सूत्रधार बाबुलाल चौधरी ऊर्फ राहुल चौधरी (३९) याने धर्मेंद्र पांडे यांच्या कागदपत्रांच्या आधारे रोमेक्स ट्रेडिंग नावाची एक कंपनी सुरू केली होती. राजेश कुमार शर्मा या लेखापरीक्षकाने (सीए) यातील कागदपत्रांची कायदेशीर बाजूंची पडताळणी केली. गोपनीय माहितीच्या आधारे बाबुलाल चौधरी, धर्मेंद्र पांडे आणि राजेश कुमार शर्मा यांच्या व्यवसायाची ठाण्याच्या सीजीएसटी आयुक्तालयातील अधिकाºयांनी पाहणी केली. याठिकाणाहून त्यांनी काही आक्षेपार्ह कागदपत्रेही हस्तगत केली. या तिघांचेही जबाब सीजीएसटीच्या अधिकाºयांनी नोंदवले असून त्यात अनियमितता आणि बेकायदेशीर बाबी आढळल्याने त्यांना अटकही केल्याचे उपायुक्त अजित डेन यांनी सांगितले.आरोपींनी दिलेल्या कराच्या माहितीनुसार जुलै २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत सुमारे ६० कोटींचा कर या तिघांनी बुडवल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या करांच्या संदर्भातील योग्य ती कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन या तिघांनाही सीजीएसटी विभागाने केले होते. मात्र, त्यांच्याकडून आरोप फेटाळण्यासाठी कोणतीही कागदपत्रे सादर केली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांच्या करभरणा फायलीमध्ये अनेक अनियमितता आढळल्याने ही कारवाई झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तिघांनाही मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.
६० कोटींचा कर चुकवणाऱ्या तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 3:06 AM