टिटवाळा : मुसळधार पावसामुळे खडवली येथील भातसा नदीला पूर येऊ न रविवारी जूगावातील ५८ ग्रामस्थ अडकले होते. गावाला अक्षरश: पाण्याचा वेढा पडल्यामुळे हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. वर्षभराचे साठवलेले धान्य, दुभत्या म्हशी, शेळ्या आणि भातशेती पाण्यात वाहून गेल्याचे पाहून मोलमजुरी करणाऱ्या ग्रामस्थांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले. पुरातून जीव वाचला, पण बुडालेला संसार पुन्हा कसा उभा करायचा, याची चिंता त्यांच्या चेहऱ्यांवर उमटली होती. मंगळवारी सायंकाळी तीन दिवसांनंतर हे ग्रामस्थ स्वगृही परतले आहे. या गावात कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे पाहणी करत आहेत.कल्याण तालुक्यातील शहरी भागांसह ग्रामीण भागाला पुराचा मोठा फटका बसला. शेकडो घरे पुराच्या पाण्यात होती. खडवली येथे तर बिकट परिस्थिती निर्माण होऊ न जूगावात २० महिला, २५ पुरु ष आणि १३ लहान मुले असे ५८ लोक अडकले होते. त्यांची एनडीआरएफ आणि वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे सुटका करण्यात आली. सुटका केलेल्या या ग्रामस्थांची बाळकुम येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने संजय भोईर यांनी केली. तेथे त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. पूर ओसरल्यानंतर तीन दिवसांनी हे ग्रामस्थ खडवली येथील जूगावात शासकीय वाहनाने परतले आहेत.पुरात कैलास पालवी, रवींद्र सवार, विष्णू पालवी, रमेश जाधव, गणेश जाधव, शांताराम जाधव, संतोष गाडगे, राजू सवार, अनंता मुकणे, सुवर्णा पालवी, हाली जाधव, गुली सवार, फसी मुकणे आदी ५८ ग्रामस्थ अडकले होते. बुधवारी तहसीलदार आकडे यांनी पथकासह गावात पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे केले. तसेच लोकांशी चर्चा करून त्यांची व्यथा जाणून घेतल्या. पुरामध्ये वर्षभराचे साठवून ठेवलेले धान्य, ४० शेळ्या, भातशेती तसेच १० दुभत्या म्हशी वाहून गेल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.आजही तो दिवस आठवला की, अंगाला काटा उभा राहतो. तो अत्यंत कठीण काळ होता. काही तास अक्षरश: मृत्यू आमच्यासमोर उभा होता. शासकीय मदत वेळेत पोहोचली म्हणूनच आमचा जीव वाचला. मात्र, आमची जनावरे, शेती वाहून गेल्याने आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत.- कैलास पालवीआमच्या गावाला चारही बाजूंनी पुराने वेढले होते. यातून आम्ही वाचू, याची आशाच सोडली होती. आमचे नशीब मोठे म्हणूनच मदत वेळेत मिळाली. - रवींद्र सवारपुरातून बाहेर काढून आम्हाला सुरक्षितस्थळी हलवले; पण आमचे लक्ष घराकडे लागले होते. आपल्या जनावरांचे, शेती आणि घरांचे काय झाले असेल, ही चिंता सतत मन पोखरत होती. मंगळवारी सायंकाळी घरी आम्ही परतलो, तेव्हा पुरात आमच्या आयुष्यभराची कमाई वाहून गेल्याचे पाहायला मिळाले. - विष्णू पालवी
तीन दिवसांनंतर जूगावातील ५८ ग्रामस्थ परतले स्वगृही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 12:19 AM