ठाणे : जिल्ह्यात १४ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या कालावधीमध्ये जिल्ह्यातील गणेशभक्तांसह नागरिकांनी, ग्रामस्थांनी स्वत:ची काळजी घेण्यासह वाहत्या पाण्यात, नदी पात्रात, धबधब्यांच्या ठिकाणी न जाण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
गणेश भक्तांनी पावसाच्या कालावधीत नदी, नाल्याच्या पुरातून वाहन चालवू नये, पुलावरून संरक्षक दगडावरून पाणी वाहत असल्यास प्रवास टाळावा. मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन अशा ठिकाणी जाणे टाळण्याचे सूचित करण्यात आले आहे. या कालावधीत आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये. घरामध्ये पाणी घुसून पाण्याची पातळी वाढत असल्यास तत्काळ घर सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल, तर तत्काळ उंचावरील ठिकाणी, सुरक्षितस्थळी आवश्यक साधनसामग्री सोबत घेऊन स्थलांतरित होण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.