ठाणे : दोन एसटी बस एकमेकांवर आदळल्याने सॅटीस पुलावर झालेला हा एसटीचा पहिलाच अपघात असून, यामध्ये पालकांशिवाय पहिल्यांदाच ठाण्यात महाविद्यालयीन प्रवेशाबाबत चौकशीसाठी आलेले भिवंडीतील तीन मित्र जखमी झाले. त्यातील दोघांवर प्राथमिक उपचार करून घरी सोडले असून, एकाला त्याचे नातेवाईक खाजगी रुग्णालयात घेऊन गेले आहेत.अथर्व मोरे, पार्थ मेहता आणि प्रथमेश वाडिया असे त्या १५ ते १६ वयोगटातील त्या मित्रांची नावे आहेत. तिघेही भिवंडीतील रहिवासी असून, नुकतेच ते दहावी पास झाले आहेत. तसेच तिघेही पॉलिटेक्निकला प्रवेश घेणार असल्याने त्याची चौकशीसाठी ते गुरुवारी सकाळी ठाणा कॉलेजला आले होते. चौकशी करून तिघेही घरी जाण्यासाठी ठाणे एसटी स्थानकात आले. साधारणत: १५-२० मिनीट बसची वाट पाहिल्यावर ते ठाणे-भिवंडी एसटी बसमध्ये चढले. त्यावेळी तिघांना एकाच सीटवर जागा मिळाली. बस सुटल्यानंतर बोलण्यात गुंग आणि बेसावध असताना त्यांच्या बसचा अपघात झाला. अपघातात पार्थच्या तोंडातून आणि प्रथमेशच्या नाकातून रक्त येत होते.घाबरलेल्या अवस्थेत कसेबसे ते बसमधून बाहेर पडले. त्याचवेळी त्या तिघांना प्रथमेश बागुल नामक तरुणाने एका रिक्षातून सिव्हील रुग्णालयात आणले. अपघातानंतर ते बऱ्याच वेळ रस्त्यावर उभे होते. या अपघातात अथर्वच्या कापळाला टेंगुळसारखे आले आहे. पार्थच्या ओठाला मार लागला असून, त्या दोघांपेक्षा प्रथमेशच्या नाकाला जरा जास्त जखम झाली आहे. अपघाताची माहिती कळताच, प्रथमेश याचे नातेवाईक तातडीने आले आणि त्याला घेऊन गेले. अथर्व आणि पार्थ यांचे नातेवाईक आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.>ठाण्यात येताना नेहमीच पालकांबरोबर येत होतो. आज पहिल्यांदा आम्ही तिघे कॉलेजमध्ये प्रवेशाबाबत चौकशी करण्यासाठी आलो होतो. घरी जाताना हा अपघात झाला असून यामध्ये तिघांनाही मार लागला आहे. - पार्थ आणि अथर्व
प्रथमच एकटे बाहेर पडलेले भिवंडीतील तीन मित्र जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 3:12 AM