- मुरलीधर भवार, कल्याण
‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय एका आदिवासी महिलेला आला आहे. गंभीर दुखापत झालेल्या रुग्णावर तातडीने उपचार सुरू करण्याचे सरकारी आदेश असताना सायन रुग्णालयात तिला उपचाराविना तिष्ठीत ठेवले. पोलीस व सामाजिक कार्यकर्त्याने रुग्णालय प्रशासनाला सरकारी आदेशाची जाणीव करून देताच तिच्यावर तीन तासांनंतर उपचार करण्यात आले.शहापूर तालुक्यातील रास गावातील सुमन मुकणे ही भाजीपाला विकून उदरनिर्वाह करते. ती तिच्या दोन लहान मुलांसह शुक्रवारी दुपारी आंबिवली परिसरात भाजीविक्रीसाठी निघाली होती. आंबिवली स्थानकात ती दीड वाजता उतरताच अचानक फलाटावर कोसळली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस परमेश्वर खरात यांनी तिला केडीएमसीच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात नेले. सुमनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तेथील डॉक्टरने तिला सायन रुग्णालयात हलवण्याची सूचना केली. खरात यांनी तिला सायन नेले. तेथील डॉक्टरांनी सिटी स्कॅनसाठी १२०० रुपये शुल्क भरण्यास सांगितले. तेवढे पैसे खरात यांच्याकडे नसल्याने त्यांनी त्यास आक्षेप घेतला. गंभीर दुखापत झालेल्या रुग्णावर तातडीने उपचार करणे आवश्यक असताना पैशासाठी अडवणूक करणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी केला. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी सुमनच्या वारसांना बोलावून घ्या, असे सांगितले. या सगळ््या प्रकारात सुमनला तीन तास उपचार मिळाले नाहीत.सरकारी रुग्णालयातील ही वागणूक पाहून खरात यांनी सामाजिक कार्यकर्ते समीर जव्हेरी यांच्याशी साधला. जव्हेरी यांनी रुग्णालयाच्या डीनशी तातडीने संपर्क साधून सरकारने २०११ मध्ये काढलेल्या आदेशाची आठवण करून दिली. त्यानंतर सुमनवर उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान, सुमन कशामुळे पडली, तिला दुखापत कशी झाली, हे समजू शकलेले नाही. उष्माघातामुळे तिला चक्कर आली असावी, असा अंदाज आहे. पोलीसही नेहमीच टिकेचा विषय ठरतात. खरात यांनी त्याला छेद देत खाकी वर्दीतील माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले.सुमनची मुले ‘जननी आशीष’मध्ये- सुमनच्या मुलांना रुग्णालयात नेणे शक्य नसल्याने खरात यांनी तिच्या दोन्ही मुलांना डोंबिवलीतील ‘जननी आशीष’ या निराधार मुलांच्या आश्रमात सोडले आहे. - सुमन बरी झाल्यावर तिच्याकडे तिची मुले सोपवली जाणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते जव्हेरी यांनी या प्रकरणाची तक्रार मुंबई महापालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे.