कल्याण : वादळी वाऱ्यामुळे कल्याण शीळ रस्त्यावर होर्डिंग पडण्याच्या तीन घटना घडल्या. दुपारी एका घटनेत टेम्पोतील दोन जण जखमी झाले. जखमींची नावे सचिन चव्हाण आणि छगन चौधरी अशी आहेत. सायंकाळी कल्याण शीळ रस्त्यावरील कल्याण मेट्रो मॉलनजीक एका बसवर जाहिरातीचे होर्डिंग पडल्याने खासगी बसमधील आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले. बसमध्ये एकूण २२ प्रवासी प्रवास करीत होते. होर्डिंग पडत असल्याचे पाहून बसचालक अरुण दातखिळ यांनी वेळीच ब्रेक दाबला. त्यामुळे होर्डिंग बसच्या पुढच्या भागावर पडले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे २२ जणांचा प्राण वाचला. दरम्यान, सायंकाळी चार वाजता कल्याण शीळ रस्त्यावरील पलावा जंक्शन येथेही होर्डिंग पडले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी घाव घेतली. आ. पाटील म्हणाले की, राज्यात यापूर्वीही होर्डिंग पडून लोक मृत्युमुखी पडले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि ठाणे महापालिकेकडे जीवघेण्या ठिकाणी बसवलेली होर्डिंग काढून टाकण्याची मागणी केली होती. अधिकारी आणि बड्या जाहिरात कंपन्यांचे साटेलोटे असल्याने ही होर्डिंग्ज काढली जात नसल्याचा आरोप पाटील यांनी केला.
दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या गच्चीवरील पाण्याची टाकी खाली पडली. या घटनेत कोणालाही इजा झाली नाही.
------------------
वाचली