अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे महापालिका हद्दीत मागील शनिवारी सकाळी आगीच्या तीन घटना घडल्या आहेत. इमारतीच्या तळ मजल्यावरील एका सलुनच्या पोटमाळ्यावर, कळव्यात रेल्वे ट्रॅक बाजूला असलेल्या कचऱ्याला आणि माजिवडा येथील सीएनजी पंपाजवळ एका रिक्षाला आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवत हानी झाली नसली तरी इतर हानी झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
नौपाडा पोलीस ठाण्याजवळ ट्रॉपिकल इलाईट या तळ अधिक २० मजली इमारतीच्या तळमजल्यावर एका सलूनमध्ये असलेल्या पोटमाळ्यावर आग लागल्याची घटना सकाळी १०.२१ च्या सुमारास घडली. आगीची माहिती मिळताच, ठाणे अग्निशमन दल, महावितरण आणि ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अग्निशमन विभागाने एका फायर वाहनासह ही आग आटोक्यात आणली. या आगीत कोणालाही दुखापत झाली नाही. परंतु यात सलून मधील एसी, २ मसाज आराम खुर्ची आगीत जळून खाक झाल्या आहेत.
दुसरीकडे कळवा भागात कळवा रेल्वे कॉलनी जवळ रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत कचऱ्याला आग लागल्याची घटना दुपारी १२.०९ च्या सुमारास घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन ही आग विझविली. या कोणत्याही प्रकारची जिवीत अथवा वित्त हानी झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. तर तिसºया घटनेत माजिवडा येथील भारत पेट्रोलियम पंप जवळ रवी वजन काट्याजवळ सीएनजी पंप मधून सीएनजी बाहेर जात असतांना रवींद्र राय यांच्या रिक्षाला आग लागल्याची घटना दुपारी १२.२३ च्या सुमारास घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग तत्काळ आटोक्यात आणल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. या आगीत रिक्षाचे जळाली असून जिवीत हानी झाली नाही.