ठाणे : कळव्यात रिक्षावर झाड पडून रिक्षाचालक जखमी झाल्याची घटना ताजी असताना, वर्तकनगर येथे बुधवारी रात्री नारळाचे झाड घरावर पडून तिघे जण जखमी झाले. तिघांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
वर्तकनगर येथील पोखरण रोड क्रमांक १, विजयनगरीमधील प्यारेलाल यादव चाळीतील रूम नंबर ६वर बुधवारी रात्री पडले. यामध्ये विनोद रामधनी जैस्वाल (४४), पूजा रविदास जैस्वाल (२२) व आदित्य हिरेंद्र चव्हाण (९) हे तिघे जखमी झाले असून, विनोद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दोघांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि वर्तकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत रामधनी जैस्वाल यांच्या मालकीच्या घराच्या छताचे नुकसान झाले असून, झाड हटविण्याची कारवाई तातडीने हाती घेण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभाग अधिकारी संतोष कदम यांनी दिली.