लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : चरस या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या अनिलकुमार प्रजापती (४२) याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक किलाे ८९० ग्रॅम वजनाचे १८ लाख ९० हजारांचे चरस हस्तगत केल्याची माहिती पाेलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी बुधवारी दिली.
अमली पदार्थ विक्रीसाठी एक व्यक्ती भिवंडीतील टेमघर पाइपलाइन रोडलगत येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली हाेती. त्याच माहितीच्या आधारे विशेष कृती दलाचे सहायक पाेलिस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक मालाेजी शिंदे, निरीक्षक वनिता पाटील, सहायक पाेलिस निरीक्षक सुनील तारमळे, भूषण कापडणीस, श्रीकृष्ण गाेरे आणि उपनिरीक्षक विजयकुमार राठाेड आदींच्या पथकाने १३ जून राेजी सायंकाळी सहाच्या सुमारास सापळा रचून अनिलकुमार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक किलाे ७२० ग्रॅम वजनाचे एक १७ लाख २० हजारांचे चरस जप्त केले.
याप्रकरणी शांतीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिलकुमार याला अर्जुनकुमार प्रजापती (३८) या त्याच्याच चुलत भावाने चरस विक्री केल्याची माहिती तपासात समाेर आली. त्याच आधारे त्याला खंडणी विराेधी पथकाने २० जून राेजी अटक केली. या प्रकरणात अर्जुनकुमार हा मुख्य सूत्रधार असल्याचेही समाेर आले. त्यानेच श्यामबाबू सराेज (५१) यालाही चरस विक्री केली. त्यानंतर त्यालाही नवी मुंबईतून २१ जून राेजी अटक केली. त्याच्या घरातून एक लाख ७० हजारांचे १७० ग्रॅम वजनाचे चरस जप्त करण्यात आले. या तिघांकडून आतापर्यंत १८ लाख ९० हजारांचे चरस जप्त केले आहे. सहायक पाेलिस निरीक्षक तारमळे हे अधिक तपास करीत आहेत.सूत्रधार अर्जुनकुमार विरुद्ध उत्तरप्रदेशात अनेक गुन्हे-चरसची तस्करी करणारा मुख्य सूत्रधार अर्जुनकुमार प्रजापती याच्याविरुद्ध उत्तरप्रदेशात प्रयागराजमधील कैन्ट पाेलिस ठाण्यात हत्यार कायद्यासह एनडीपीएस कायद्याखाली पाच गुन्हे दाखल आहेत.