ठाणे : हलाखीची परिस्थिती असलेल्या रवी थामा (३२) या मित्राला सहानुभूती म्हणून मदत करणाऱ्या समीना दसुरकर (३२) या मैत्रिणीलाच धमकावून तिच्याकडून दोन लाख ९२ हजारांचा ऐवज लुबाडल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येथील वंदना सिनेमागृहाजवळील रजनीगंधा सोसायटीत राहणारी समीना वागळे इस्टेट येथील एका कंपनीत नोकरीला होती. तिथे तिची ओळख रवीशी झाली. त्याला पैशांची गरज होती म्हणून तिने तिची सोनसाखळी गहाण ठेवून त्याला सहा हजार रुपये दिले. त्यानंतर, पुन्हा त्याने तिच्याकडे दागिने मागितले. तिने देण्यास नकार दिल्यानंतर आधीची सोनसाखळीही घरातून चोरून आणून आपल्याला दिल्याचे तुझ्या कुटुंबीयांना सांगू, अशी त्याने तिला धमकी दिली. तेव्हा तिने त्याला पुन्हा १३६ ग्रॅम वजनाचे दागिने दिले. त्यातून त्याने नऊ हजार रुपये मिळविले. तिच्याकडून त्याने आणखी दागिने घेऊन ते कल्याणच्या एका खासगी बँकेत गहाण ठेवून ५४ हजार मिळविले. आॅगस्ट ते सप्टेंबर २०१५ या काळात हा प्रकार सुरू होता. या दरम्यान त्याने ६० हजारांचा सोन्याचा हार, ४० हजारांचे सोन्याचे कडे, ४० हजारांच्या रिंगा, २० हजारांचा हार असा सुमारे तीन लाखांचा ऐवज तिच्याकडून त्याने लुबाडला. अखेर, १५ आॅक्टोबर रोजी तिने याप्रकरणी तक्रार दाखल केली असून उपनिरीक्षक श्रीकांत पवार हे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
मैत्रिणीचे तीन लाखांचे दागिने लुबाडले
By admin | Published: October 19, 2015 12:59 AM