लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांच्या मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेले दोन लाख ९२ हजार २३९ नावे मतदार यादीतून कायमची वगळून त्यांना बाद केले आहे, तर १७ हजार ३२५ मतदारांची छायाचित्रे प्राप्त केली जात आहेत. उर्वरित पाच लाख आठ हजार ४६२ मतदारांची छायाचित्रे मिळविण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे, अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांना दिली. मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी देशपांडे यांनी ही ऑनलाइन झाडाझडती सोमवारी घेतली.
मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राज्यात सुरू आहे. त्यास अनुसरून देशपांडे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे अन्य जिल्ह्यांसह ठाण्याचा आढावा घेतला. मतदारांचे छायाचित्र उपलब्ध करून घेणे, दुबार किंवा समान नोंदी कमी करण्याचे काम जिल्ह्यात सुरू असल्याचे नार्वेकर यांनी यावेळी सांगितले. या दरम्यान या दूरदृश्य प्रणाली आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील १८ मतदारसंघांतील नोंदणी अधिकाऱ्यांची बैठकही सायंकाळी घेतली. यावेळी जिल्हा उप निवडणूक अधिकारी अर्चना कदम, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर या महापालिकांच्या निवडणुकांसाठी या मतदार याद्या उपयुक्त ठरणार आहेत. यासाठी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या बैठका घ्याव्यात, मतदार यादीच्या कामाला गती द्यावी, अशी तंबी देऊन आवश्यकता भासल्यास अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. १ नोव्हेंबरपासून १ जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू होणार आहे. मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण आणि प्रमाणीकरण यासाठी ५ ऑक्टोबर ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे मतदारांनी यादीतील आपले नाव, छायाचित्र ३० सप्टेंबरपूर्वी तपासणी करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी मतदारांना केले.
........