मीरा रोड : वाहन परवाना नसताना ट्रिपल सीट भरधाव दुचाकी चालवणाऱ्या तिघा अल्पवयीन मुलांनी वाहतूक पोलिसाला जबर धडक देऊन जखमी केल्याची घटना घडली असून, भाईंदर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पालक अल्पवयीन मुलांना परवाना नसताना वाहन चालवण्यास देत असल्याचे वाढते प्रकार चिंताजनक आहेत.
वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी धीरज पवार हे बुधवारी दुपारी १ च्या सुमारास भाईंदर पश्चिमेला सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ कर्तव्यावर तैनात होते. त्यावेळी राधास्वामी सत्संगच्या दिशेने दुचाकी भरधाव दिसली. त्यावर तिघेजण स्वार होते. पवार यांनी दुचाकी थांबवण्याचा प्रयत्न केला असता दुचाकीस्वारांनी वेगाने येऊन थेट पवार यांना धडक दिली. या धडकेने पवार यांचा डावा हात मोडला असून, डोक्याला, कानाला आणि कमरेलाही दुखापत झाली आहे. त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.
वाहतूक पोलिसाला धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून दुचाकीवरील दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. पळून गेलेला चालक सुद्धा अल्पवयीन होता. त्याला बुधवारी रात्री पकडण्यात आले. तिघेही अल्पवयीन असल्याने त्यांना सुधारगृहात पाठवल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दुचाकीच्या मालकावर सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.